आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविण्यात आल्यानंतर कर्नाटकमधील निवडणुकीचा प्रचार थंडावला असून रविवारी तेथे सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सत्तारूढ भाजप, काँग्रेस आणि जेडीएस या पक्षांमध्ये प्रमुख लढत होणार असून माजी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक जनता पार्टीचे भवितव्यही मतदानावर अवलंबून आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आपल्या भाषणांमध्ये सत्तारूढ भाजपवर भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून जोरदार टीका केली होती. त्याला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. मतदानापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीनुसार काँग्रेसला बहुमत मिळण्याची अथवा काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भाजप आणि जेडीयूचा क्रमांक लावण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला किती जागा मिळतात आणि ते ‘किंगमेकर’ होतात का, याबद्दलची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. मतदान मुक्त आणि मोकळ्या वातावरणात पार पडावे यासाठी १.३५ लाख पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदानासाठी एक तास वाढविण्यात आला आहे. कर्नाटकमधील २२४ पैकी २२३ मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. भाजपच्या एका उमेदवाराचे निधन झाल्याने पेरियापाटणा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा