कर्नाटक विधानसभेत बुधवारी (१९ जुलै) हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विधानसभेच्या अधिवेशनावेळी भाजपा आमदारांनी सभापतींच्या खुर्चीच्या दिशेने कागद भिरकावले. याबाबत कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “ही दुर्दैवी घटना आहे. आपण विधीमंडळाच्या सभागृहासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे, काही नियम बनवले आहेत. सभागृहाचे काही नियम आहेत. त्यांना (भाजपा) तिथे आंदोलन करण्यापासून कोणीही रोखत नाही, परंतु विधीमंडळात जो प्रकार झाला तो दुर्दैवी आहे.
या घटनेनंतर भाजपाच्या १० आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या आमदारांनी उपसभापती रुद्रप्पा लमानी यांच्या अंगावर कागद फेकल्याचा आरोप आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी भोजनासाठी न थांबता सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आमदारांनी सभापतींच्या खुर्चीवर व उपसभापतींच्या अंगावर कागद फेकले.
सभागृहाच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्ष भाजपा आणि जेडीएसचे आमदार निषेध आंदोलन करत होते. तसेच त्यांनी आरोप केला की, काँग्रेस सरकारने त्यांच्या आघाडीतल्या नेत्यांच्या सेवेसाठी ३० आयएएस अधिकाऱ्यांना तैनात केले होते. हा गदारोळ सुरू असतानाच विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर म्हणाले, सभागृहाचे कामकाज दुपारच्या जेवणासाठी थांबवलं जाणार नाही, अर्थसंकल्प आणि इतर मुद्द्यांवर चर्चा सुरूच राहील. त्यानंतर उपसभापती रुद्रप्पा लमाणी सभागृहाचं कामकाज चालवत होते.
सभागृहाचे कामकाज सुरू ठेवण्याच्या आणि भोजनासाठी ब्रेक न देण्याच्या सभापतींच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी सभापतींच्या खुर्चीवर व उपसभापतींच्या अंगावर कागद फेकून गोंधळ घातला. यावेळी भाजपा आमदार म्हणाले, अशा प्रकारे सभागृह चालवता येणार नाही. कोणत्या नियमानुसार तुम्ही दुपारचं जेवण रद्द करताय?
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी विरोधी पक्षांच्या (नरेंद्र मोदींविरोधातील देशभरातील नेत्यांची आघाडी) नेत्यांसाठी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाच्या कार्यक्रमाला सभापती यू. टी. खादर उपस्थित असल्याचा मुद्दाही भाजपा आमदारांनी अनेकवेळा उपस्थित केला. तसेच ज्या प्रकारे सभागृहाचं कामकाज सुरू आहे त्यावर आक्षेप घेतला. यावेळी भाजपा आमदारांनी सभापतींच्या खुर्चीवर आणि उपसभापतींच्या अंगावर कागद फेकले. दरम्यान, भाजपा आमदारांच्या या कृतीवर काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेतला.
हे ही वाचा >> मणिपूरमधील ‘त्या’ घटनेवरून शरद पवारांचा संताप; म्हणाले, “विदारक दृश्य पाहून…”
या गादारोळानंतर विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर यांनी भाजपाच्या १० आमदारांना निलंबित केलं आहे. यामध्ये धीरज मुनिराज, उमानाथ कोटियन, अरविंद बेलाड, यशपाल सुवर्णा, वेदव्यास कामत, आर. अशोक, सुनील कुमार, अरागा ज्ञानेंद्र, भरत शेट्टी आणि अश्वथनारायण यांचा समावेश आहे.