बंगळुरूमध्ये एका दुकानदाराने ‘अजान’च्या वेळी स्पीकरवर मोठ्या आवाजात संगीत वाजविल्यामुळे पाच-सहा जणांनी दुकानात येऊन युवकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण झालेल्या युवकाने आपण ‘अजान’च्या वेळी संगीत वाजविल्यामुळे पाच-सहा जणांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असू तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
बंगळुरूमधील एका युवकाच्या मोबाईल दुकानात काही व्यक्तींनी अचानक येऊन त्याला मारहाण केल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर मोबाईल दुकानदार युवकाने ‘आपण हनुमान चालीसा वाजविल्यामुळे मारहाण झाली’ असा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडीओ भाजपाने एक्सवर (ट्विटर) शेअर करत काँग्रेसवर टीका केली आहे.
हेही वाचा : बिहार : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! जेडीयू १६ तर भाजपाला ‘इतक्या’ जागा; पासवान यांनाही मोठा वाटा
मारहाण झालेला युवक काय म्हणाला?
“काल (१७ मार्च) दुपारी दुकानात एक स्पीकर दुरूस्त करत असताना भजन सुरू केले होते. पण त्यानंतर तीन-चार लोक आले आणि स्पीकर वाजवू नका असं सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर तरुणाने मारहाण करणाऱ्यांना जाब विचारला असता ‘आमच्या अजानची वेळ आहे, अजानच्या वेळी स्पीकर वाजवायचा नाही’ असं मारहाण करणाऱ्यांनी सांगितलं. स्पीकर वाजवले तर जीवे मारण्याची धमकी देत माझा गळा पकडत सर्वांनी मिळून मारहाण केली. याआधी देखील अशी घटना घडली होती, पण पुढे काही झाले नाही”, अशा शब्दांत मारहण झालेल्या युवकाने घडलेला प्रकार कथन केला.
भाजपाने ‘एक्स’वर काय म्हटलं?
स्पीकरवर मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याप्रकरणी झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत भाजपाने ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेसवर गंभीर आरोप केले. “काँग्रेसच्या राजकारणाचा फटका कर्नाटकला बसत असून हिंदूंना खुलेआम घाबरविण्याचे काम होत आहे. राहुल गांधींनी ‘शक्ती’विरुद्ध लढण्याची घोषणा करताच अशा प्रकारची घटना घडली. काँग्रेसच्या राजवटीत, हिंदूंना दुय्यम स्थान देण्यात येत आहे”, असा आरोप भाजपाने केला.