कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ६ वेळा आमदार असलेले भाजपा नेते जगदीश शेट्टर यांनी आज ( १७ एप्रिल ) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाकडून शेट्टर यांना हुबळी धारवाड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे शेट्टर यांनी काल ( १६ एप्रिल ) आमदारकीचा राजीनामा दिला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी वेणुगोपाल, डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत शेट्टर यांनी प्रवेश केला.
“भाजपाच्या काही नेत्यांनी उमेदवारी देण्यावरून अपमानास्पद वागणूक दिली. जो पक्ष स्वत: उभा केला, त्या पक्षातून बाहेर जावं यासाठी प्रयत्न करण्यात आले. आमदारकीचा राजीनामा दिला असून, पुढील निर्णय कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या सल्ल्यानं घेतला आहे,” असं शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्पष्ट केलं.
अशातच कर्नाटक भाजपा नेते आणि माजी मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी जगदीश शेट्टर यांना एक खुले पत्र लिहलं आहे. “काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलं असेल. पण, कितीही संघर्ष केला तरी तुम्ही जिंकू शकणार नाही. काँग्रेस सत्तेत आल्यास गोहत्याबंदी विधेयक मागे घेणार आहे. याला तुम्ही कसा पाठिंबा द्याल? पीएफआयवरील बंद मागे घेणार असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे. मग, तुम्ही दहशतवाद्यांचे समर्थन करणार का?,” असा सवाल ईश्वरप्पा यांनी शेट्टर यांना विचारला आहे.
हेही वाचा : राजकीय गरमागरमीत राहुल गांधींनी घेतला नंदिनी आइसक्रीमचा आस्वाद; भाजपाचे नेते म्हणतात…
“तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल का? तुम्ही भाजपासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. मग, उद्या तुमच्या नातवाने काँग्रेसमध्ये प्रवेश का केला? असं विचारल्यावर काय सांगाल. त्यामुळे माफी मागून धर्म आणि तत्व जपणाऱ्या पक्षात परत यावे,” असं आवाहनही ईश्वरप्पा यांनी केलं आहे.