Karnataka BJP Leader Police officer Slap Each Other Viral Video : कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि एक पोलीस उपनिरीक्षक एकमेकांना मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शुक्रवारच्या रात्रीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये भाजपा नेते आणि पोलीस कर्मचाऱ्यात वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे, जो पुढे चांगलाचा पेटतो आणि दोघे एकमेकांना मारहाण करू लागतात. या हाणामारीदरम्यान दोघे एकमेकांना कानशिलात लगावताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील आहे आणि व्हिडिओमधील पोलिस अधिकारी हे पीएसआय गडिलिंगप्पा आहेत. तर त्यांच्याबरोबर भाजपाचे नेते हनुमंत गौडा आहेत, जे भाजपाचे मधुगिरी जिल्हाध्यक्ष आहेत.
नेमकं काय झालं?
एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुर्गडा श्री हॉटेल रोडच्या जवळ लोकांचा एक गट जमला होता. उपनिरिक्षक गडिलिंगा गौदार यांनी त्यांना गर्दी कमी करण्यास आणि घरी जाण्यास सांगितले. मात्र याचा भाजपा नेत्याला राग आळा आणि त्याने पोलीस अधिकार्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर भाजपा नेत्यानेही पोलीस कर्मचाऱ्याला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली.
भाजपाचे काँग्रेसवर आरोप
भाजपाचे कर्नाटक राज्याचे प्रमुख बीवाय विजयेंद्र यांनीएक्स वर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली आहे.
विजयेंद्र त्याच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, राज्यात काँग्रेस सत्तेत आल्यापासून हत्या, खंडणी, दरोडे आणि बलात्काराची प्रकरणे सातत्याने घडत आहे. सामान्य व्यक्ती सुरक्षित नसल्याची स्थिती असून कायदा आणि व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे.
पुढे ते म्हणाले आहेत की, दरम्यान, काही कनिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी पोलीसांच्या क्रूरतेचा वापर करत आहेत आणि सामान्य लोक आणि जबाबदार नागरिकांना मारहाण देखील करत आहेत. चित्रदुर्गात पीएसआय गडिलिंगप्पा यांनी आमच्या पक्षाचे मधुगिरी जिल्हाध्यक्ष हनुमंतेगौडा यांच्याविरुद्ध दाखवलेल्या गुंडगिरीचा कर्नाटक भाजपा तीव्र निषेध करतो.”
अधिकरी जे सुसंस्कृत समाजात शांतता स्थापन शकत नाहीत ते रात्रीच्या वेळी पोलिसांची क्रूरता दाखवण्यासाठी बाहेर पडतात. व्यक्तीचे सोशल स्टेटस काहीही असले तरी गुंडगिरी करून हल्ला करतात, हे पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेची प्रतिष्ठा कमी करण्यासारखे आहे.
या हल्ल्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला, ते म्हणाले की, काही पोलीस अधिकारी, जे काँग्रेसच्या प्रभावामुळे त्यांच्या खुर्चीत बसले आहेत, त्यांना असे वाटते की त्यांना कोणी काहीही करू शकत नाही आणि ते त्यांचा अहंकार सर्वत्र दाखवत आहेत. त्यामुळे चित्रदुर्ग घटनेमागे राजकीय हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस हे पावरफुल राजकारण्यांच्या हातातील बहुल्यांप्रमाणे वागत आहेत आणि डिपार्टमेंटचे नाव खराब करत आहेत. मी इशारा देतो की जर पोलीस महासंचालकांनी चित्रदुर्गचे पीएसआय गडिलिंगप्पा यांना तात्काळ निलंबित केले नाही, तर भाजपाला सामान्य नागरिकांबरोबर त्यांच्या लढ्यात सहभागी व्हावे लागेल, अशा शब्दात त्यांनी पोलीस अधिकार्याच्या निलंबनाची मागणी केली आहे.