परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना थोडे कमी गुण मिळाले की गुण वाढतील या अपेक्षेने ते पेपर रिचेकिंगला पाठवतात. पण, कर्नाटकमध्ये १० वीच्या एका विद्यार्थ्याने केवळ एक गुण कमी मिळाला म्हणून पेपर रिचेकिंगला पाठवला. विशेष म्हणजे रिचेकिंगमध्ये त्याला गमावलेला तो एक गुणही मिळाला आणि आता १०० टक्के गुण मिळवण्याची किमया त्याने केली आहे.
मोहम्मद कैफ मुल्ला याला दहावीत ६२५ पैकी ६२४ मार्क मिळाले होते आणि तो संयुक्तपणे एका विद्यार्थ्यासोबत टॉपर होता. पण, आपला एक गुण गेल्यामुळे तो नाराज होता. हा एक गुण कसा गेला, याचा शोध घेण्यासाठी त्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. त्याला विज्ञान या विषयात एक गुण कमी मिळाला होता. रिचेकिंगमध्ये अखेर त्याला गमावलेला एक मार्कही मिळाला आणि आता बौर्डातील एकमेव टॉपर म्हणून त्याला घोषित करण्यात आलं आहे.
माध्यमांमधील वृत्तानुसार, १०० पैकी १०० टक्के मिळवण्याचा त्याला पूर्ण विश्वास होता. प्रत्येक पेपर झाल्यानंतर तो आपण लिहिलेली उत्तरं बरोबर आहे की नाही याची खात्री शिक्षकांकडून किंवा पुस्तकातून करुन घ्यायचा. त्याची आई परवीन मुल्ला आणि वडील हारून रशीद मुल्ला दोघेही शिक्षक आहेत. आयएएस बनण्याचं त्याचं स्वप्न आहे.