Karnataka Bus Conductor Viral Video : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना महिलांना सतत सुरक्षेची भीती असते. पुण्यातील शिवनेरी बसमध्ये झालेल्या बलात्कारप्रकरणानंतर आता अशाच एका राज्य सरकारी बसमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या घटनेतील मुख्य आरोपी हा या बसचा कंडक्टरच आहे. ज्याच्यावर बसमधील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी असते, त्यानेच क्रूरकृत्य केल्याने संताप व्यक्त केला जातोय. यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालत्या बसमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी मंगळुरूजवळील मुदिपू-स्टेट बँक मार्गावर चालणाऱ्या केएसआरटीसी सेवेदरम्यान ही घटना घडली. याबसमध्ये कंत्राटी कंडक्टर असलेल्या बागलकोट येथील ३५ वर्षीय प्रदीप कशप्पा नायकरने एका महिला प्रवाशाला झोपेत असताना अयोग्यरित्या स्पर्श केलाय. त्याचा हा किळवासाणा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली.

या कंडक्टरला आता पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून नायकरच्या कंत्राटी नोकरीच्या स्थितीबाबत केएसआरटीसीने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

गेल्या महिन्यातही काढली होती मुलीची छेड

दरम्यान, गेल्या महिन्यात कर्नाटकातील बंगळुरू येथील एका रस्त्यावर अशाचपद्धतीने एका मुलीची छेड काढण्यात आली होती. दोन तरुणी एकत्र जात असताना मागून आलेल्या एका व्यक्तीने त्यातील एका मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चिघळलं. याप्रकरणी अधिक तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेनंतर हा आरोपी कर्नाटकातून फरार झाला होता. त्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन राज्यातून शोधून काढत केरळमधून अटक करण्यात आली.