पीटीआय, हावेरी (कर्नाटक) : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातून मोठे शक्तिप्रदर्शन करत व समर्थकांच्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोम्मईंसह भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रख्यात कन्नड चित्रपट अभिनेते सुदीप उपस्थित होते. काँग्रेसने बोम्मईंविरुद्ध हुबळी-धारवाडमधील ‘अंजुमन-ए-इस्लाम’चे अध्यक्ष  मोहम्मद युसूफ सावनूर यांना उमेदवारी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोम्मई शिग्गावमधून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. येथून ते २००८ पासून तीन वेळा आमदार झाले आहेत. तत्पूर्वी, त्यांनी विविध मंदिरांत जाऊन दर्शन घेतले. तसेच शिग्गावमध्ये नड्डा व सुदीप यांच्यासोबत मोठी प्रचारफेरीही (रोड शो) काढली. नंतर बोम्मई, नड्डा व सुदीप यांनी जाहीर सभेला संबोधित केले व बोम्मई आणि भाजपला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

नड्डा म्हणाले, की बोम्मई यांनी भरलेला उमेदवारी अर्ज केवळ आमदारपदासाठी नसून, तो कर्नाटकला विकासासाठी दिशादर्शक आहे. मी फक्त बोम्मईंसाठी मते मागण्यासाठी आलो नाही, तर कमळ चिन्हासाठी बहुमत मागायला आलो आहे. भाजपला बहुमत मिळाल्यास कर्नाटकात सतत विकासाची गंगा सातत्याने वाहत राहील.

भाजपच्या ४० ‘स्टार’ प्रचारकांमध्ये मोदी, आदित्यनाथ, फडणवीस

  • विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४० प्रमुख ‘स्टार’ प्रचारकांची यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रमुख केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
  • केंद्रीय मंत्र्यांत राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, धर्मेद्र प्रधान, मनसुख मंडाविया आणि प्रल्हाद जोशींचा समावेश आहे.
  • आदित्यनाथ यांच्याशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे.
  •   मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटक भाजपचे प्रभावी नेते बी. एस. येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा, कर्नाटकचे काही मंत्री आणि राज्य पक्षाचे नेत्यांचाही या यादीत समावेश आहे.

शक्तिप्रदर्शनाद्वारे सिद्धरामय्यांचा वरुणातून उमेदवारी अर्ज दाखल

मैसुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज बुधवारी भरला. मैसुरू जिल्ह्यातील वरुणा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते असलेल्या सिद्धरामय्यांसह अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी माजी मंत्री एच. सी. महादेवप्पा व इतर काँग्रेस नेते उपस्थित होते.

भाजपने वरुणातून सिद्धरामय्यांविरुद्ध विद्यमान मंत्री व्ही. सोमण्णा यांना उमेदवारी दिली आहे. सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतींद्र सिद्धरामय्या हे काँग्रेसचे वरुणाचे विद्यमान आमदार आहेत. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी सिद्धरामनहुंडी या त्यांच्या मूळ गावातील मंदिरात त्यांचे कुलदैवत सिद्धरामेश्वराची प्रार्थना केली आणि तेथे श्रीराम मंदिरातही पूजा-प्रार्थना केली. मैसुरूतील प्रसिद्ध चामुंडेश्वरी मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी मोठी फेरी काढली व एका जाहीर सभेला संबोधित केले. वरुणात उमेदवारीद्वारे सिद्धरामय्या पुन्हा मूळ मतदारसंघात परतले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka chief minister bommai candidature filing power show cheering of supporters ysh