कर्नाटकमध्ये बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री होऊन आज एक वर्ष पूर्ण झालंय. तसेच त्यांच्या सरकारलाही एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, पण ते सर्व कार्यक्रम बोम्मई यांनी रद्द केले आहे. मंगळवारी दक्षिण कन्नडमधील भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तरू यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बोम्मई यांनी हा निर्णय घेतला आहे. ते आज प्रवीण नेत्तरूच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी बेल्लारे इथे जाणार असल्याचंही म्हटलं जातंय.
बसवराज बोम्मई यांनी बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत होणारी दोड्डबल्लापूर येथील ‘जनोत्सव’ ही मेगा रॅली रद्द केली आहे, अशी माहिती दिली. तसेच राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कृत्य करणाऱ्या शक्तींचा नायनाट करण्यासाठी राज्यात विशेष प्रशिक्षित कमांडो फोर्स उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
“प्रवीण यांच्या हत्येनंतर आमच्या मनात संताप आहे. शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येनंतर काही महिन्यांत घडलेल्या या धक्कादायक घटनेने मला दुःख झालंय. आज माझ्या सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय आणि बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या सत्तेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आम्ही जनोत्सवाची योजना आखली होती, परंतु मृत प्रवीणची आई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना पाहून मी उद्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं ते म्हणाले.
नेमकं काय घडलं?
जिल्हा भाजपा युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांची बेल्लारे येथील त्यांच्या ब्रॉयलर दुकानासमोर मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी वार करून हत्या केली. ते दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथील नेट्टारू येथील रहिवासी होते. ते दुकान बंद करून घरी जात असताना त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर बुधवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटना घडल्या. हिंदू कार्यकर्त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसल्याचा आरोप करत भाजपा आणि संघ परिवाराच्या समर्थकांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता.