Siddaramaiah Nearly Slaps Police Officer : भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने केल्याने संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षकावर भरसभेतच हात उचलला. कर्नाटकात हा प्रकार घडला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या कृतीवरून आता संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची आज बेळगावी येथे जाहीर सभा होती. या सभास्थळीच भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक नारायण भारमानी स्टेज सुरक्षेकरता तैनात होते. महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ ऐकून सिद्धरामय्या यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी तत्काळ स्टेजजवळ तैनात असलेल्या पोलीस अधीक्षकाला व्यासपीठावर बोलावून घेतलं. अन् त्यांच्यावर हात उगारला. सिद्धरामय्या पोलिसांच्या कानशि‍लात लगावणार होते, पण त्यांनी लगेच आपला हात खाली घेतला. “तू, तू जो कोणी आहेस, इथे ये, तू काय करत होतास?” असं रागाच्या भरात सिद्धरामाय्या यांनी विचारलं आणि त्यांच्यावर हात उगारला.

या घटनेनंतर, जेडीएसने एक्स वरील पोस्टमध्ये सिद्धरामय्या यांच्यावर अहंकार आणि गैरवर्तनाचा आरोप केला. सार्वजनिक ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलल्याबद्दल पक्षाने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पोस्टमध्ये या कृत्याचे वर्णन अनादरपूर्ण असल्याचे म्हटले आहे आणि असे म्हटले आहे की अशा प्रकारचे वर्तन, ज्यामध्ये एकेरी शब्दात बोलणे समाविष्ट आहे, ते “अक्षम्य गुन्हा” आहे.

“तुमचा सत्तेचा कालावधी फक्त ५ वर्षांचा आहे. पण सरकारी अधिकारी ६० वर्षांपर्यंत सेवा करतात. सत्ता कोणासाठीही कायमची नसते. तुमचे गैरवर्तन दुरुस्त करा”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पहलगामवरून केलेले विधानही चर्चेत!

दरम्यान, पहलगामवरूनही सिद्धरामय्या यांनी केलेल विधान चर्चेत आहे. “पाकिस्तानविरोधात युद्धाची गरज नाही, कडक उपाययोजना केल्या पाहिजेत. सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची गरज आहे. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. शांतता असली पाहिजे, लोकांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि केंद्र सरकारने सुरक्षा उपाययोजना केल्या पाहिजेत”, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धराम्या म्हणाले. काँग्रेसने पहलगामवरून केंद्र सरकारला पाठिंबा दिलेला असताना सिद्धरामय्या यांनी केंद्राच्या भूमिकेला विरोध केल्याने त्यांच्या या वक्तव्याचे सर्वस्तरातून पडसाद उमटले. त्यानंतर त्यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, अशीही प्रतिक्रिया दिली.