अवघ्या काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये काँग्रेसनं मोठा विजय मिळवत भाजपाला पराभवाची धूळ चारली. यानंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदाची चुरस रंगली. अखेर हायकमांडनं मध्यस्थी करत सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील असा निर्णय दिला आणि कर्नाटकात शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे कर्नाटकात तातडीने आपल्या पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची विनंती केली आहे. द हिंदूनं यासंदर्भातलं वृ्त्त दिलं आहे.
सिद्धरामय्यांनी केली ५ टीएमसी पाण्याची मागणी
कर्नाटकच्या उत्तरेकडच्या जिल्ह्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं असून या जिल्ह्यांमध्ये तातडीने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. याआधीही कर्नाटक सरकारच्या विनंतीनंतर महाराष्ट्र सरकारने वारणा-कोयना पाणीसाठ्यातून कर्नाटकसाठी १ टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडलं होतं. आता पुन्हा एकदा कर्नाटक सरकारकडून ५ टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली जात आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यामध्ये वारणा-कोयना पाणीसाठ्यातून २ टीएमसी तर उजनी पाणीसाठ्यातून भीमा नदीत ३ टीएमसी पाणीसाठा सोडण्याची विनंती केली आहे.
कर्नाटकच्या बेळगावी, विजयपुरा, बागलकोट, कालाबुर्गी, यादगीर आणि रायचूर या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. यंदाच्या उन्हाळ्याची झळ या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर बसली असून मार्च महिन्यापासूनच या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्थिती चिंताजनक झाली असल्याचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. याआधीही कर्नाटक सरकारने वारणा-कोयना पाणीसाठ्यातून ३ टीएमसी तर कृष्णा पाणीसाठ्यातून ३ टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली होती.