कर्नाटकातील काँग्रेस नेते सतीश जारकीहोली यांनी ‘हिंदू’ शब्दाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. “हिंदू’ शब्दाचा अर्थ खूप घाणेरडा असून हा शब्द भारतातील नसून मूळ पर्शियन आहे”, असं विधान त्यांनी केलं होतं. या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर जारकीहोली यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. आपल्याला हिंदू विरोधी म्हणत बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी जारकीहोली यांनी या पत्रात केली आहे.
‘हिंदू’ शब्दाबाबतचं जारकीहोली यांचं वक्तव्य दुर्देवी असल्याचं बोम्मई यांनी म्हटलं होतं. “एका समाजातील मतदारांना खूष करण्यासाठी आणि अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी अर्धवट ज्ञानातून काँग्रेस नेत्याने हे वक्तव्य केलं आहे. हे राष्ट्रविरोधी असून सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे. राहुल गांधी आणि सिद्धरमैया यांचं मौन या वक्तव्याला समर्थन दर्शवत आहे का?”, असा सवाल बोम्मई यांनी केला होता. दरम्यान, “अनेक पुस्तकांमध्ये ‘हिंदू’ या शब्दाच्या पर्शियन मुळाबाबत उल्लेख आहे”, असा दावा जारकीहोली यांनी केला होता. या दाव्याबाबत आपली चूक दाखवून दिल्यास राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती.
“मी जे बोललो, त्यात काहाही चूक नाही. हा पर्शियन (हिंदू) शब्द कुठून आला याबाबत शेकडो दस्तावेज उपलब्ध आहेत. स्वामी दयानंद प्रकाश यांच्या ‘सत्यार्थ प्रकाश’, डॉ. जीएस पाटील यांच्या ‘बसवा भारत’ पुस्तकात आणि बाळ गंगाधर टिळकांच्या ‘केसरी’ या वृत्तपत्रात याबाबत उल्लेख आला आहे. याबाबत विकीपीडिया आणि संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात लेख उपलब्ध आहेत”, असे जारकीहोली यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आपलं वक्तव्य मागे घेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते जारकीहोली?
”हिंदू’ शब्दाचा अर्थ खूप घाणेरडा असून हा शब्द भारतातील नसून मूळ पर्शियन आहे. या शब्दाचा भारताशी काहीही संबंध नाही. हा शब्द लोक कसा काय स्वीकारु शकतात?,” असे वक्तव्य जारकीहोली यांनी बेळगावमध्ये रविवारी केले होते. “हिंदू शब्दाचा उगम कुठून झाला? हा शब्द आपला आहे का? हा इराण, इराक, उझबेकिस्तान, कझाकिस्तानातील पर्शियन शब्द आहे. या शब्दाचा भारताशी काय संबंध? या शब्दाचा स्वीकार तुम्ही कसा करू शकता?” असा सवाल करत त्यांनी यासंदर्भात चर्चेची मागणी केली होती.