कर्नाटकमध्ये आमदारांना रिसॉर्टला नेल्यानंतरही काँग्रेसला दिलासा मिळताना दिसत नाही. रविवारी रिसॉर्टमध्येच काँग्रेसचे दोन आमदार आनंद सिंह आणि जे एन गणेश हे एकमेकांना भिडले. दोघांमध्ये जबर हाणामारी झाल्याचे सांगण्यात येते. डोक्याला जखम झाल्याने आनंद सिंह यांना बंगळुरूतील एका रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश यांनी आनंद सिंह यांच्या डोक्यावर बाटलीने मारल्यामुळे ते जखमी झाले आहेत.

भाजपाने आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर काँग्रेसने आपल्या काही आमदारांना एका रिसॉर्टमध्ये नेले. हे आमदार शनिवारी रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होते. याचदरम्यान या दोन आमदारांमध्ये वाद झाला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेएन गणेश काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या आणखी एका आमदाराच्या संपर्कात होते आणि ते भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत होते. याचवरून आनंद आणि गणेश यांच्या वाद झाला. आनंदने गणेश यांना ‘ऑपरेशन लोट्स’च्या अपयशास जबाबदार ठरवले. यावरून गणेश यांनी रागाच्या भरात आनंद यांच्या डोक्यावर बाटलीने मारले.

याप्रकरणी कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले जमीर अहमद यांना असे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले. तिन्ही आमदार एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात चर्चा होत होती आणि मित्रांमध्ये असे होत असते. हा एक छोटा वाद होता. कोणालाही टाके पडलेले नाहीत. कोणाला रक्तही आलेले नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Story img Loader