कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवाकुमार यांनी शनिवारी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा राग आल्याने डी के शिवाकुमार यांनी त्याच्या कानशिलात लगावली. व्हायरल व्हिडिओनंतर भाजपा आणि नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
व्हिडिओत डी के शिवाकुमार कार्यकर्त्यांच्या गराड्यात पुढे जात होते. तितक्यात एक जण त्यांच्या पाठीमागे वेगाने चालत होता. त्याचबरोबर त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या या कृतीमुळे शिवाकुमार यांना चीड आली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कानशिलात लगावली. या कृत्यानंतर त्यांनी उपस्थित असलेल्या कॅमेरामनला फुटेज डिलीट करण्यास सांगितलं. तसेच यासाठी कार्यकर्ते जबाबदार असल्याचंही सांगितलं. माजी मंत्री आणि खासदार जी मडेगौडा यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते गेले होते. हा संपूर्ण प्रकरण मंड्या जिल्हा मुख्यालयाच्या दौऱ्यावर असताना घडला.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
#WATCH Karnataka Congress President DK Shivakumar slaps a party worker for trying to put his hand on his shoulder in Mandya yesterday pic.twitter.com/6ldIB08mdw
— ANI (@ANI) July 10, 2021
या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत भाजपाने टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवकुमार यांना हिंसाचाराचा परवाना दिला आहे का्?, असा प्रश्न भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवि यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर शिवकुमार यांची तुलना अंडरवर्ल्ड डॉन कोतवाल रामचंद्रा याच्याशी केली. कोतवाल रामचंद्राची बंगळुरूत १९७० ते १९८० दशकात दहशत होती. कार्यकर्त्यांसमोरच कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्याच्या कानशिलात लगावली. मग कॅमेऱ्यापाठीमागे त्यांचं रुप कसं असेल? हे सांगायला नको, अशी टोलाही त्यांनी लगावला.