कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशातच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवकुमार हे एका रोडशोदरम्यान पैसे वाटताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे आता कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
डी.के. शिवकुमारांचा पैसे वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर काँग्रेसने कर्नाटकमध्ये प्रजा ध्वनी यात्रेचे आयोजन केले आहे. मंगळवारी श्रीरंगापट्ना जिल्ह्यातील मांड्या येथे ही यात्रा पोहोचली असता कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ५०० रुपयांच्या नोटा नागरिकांच्या दिशेने फेकल्याचं बघायला मिळालं. त्याचा व्हिडीओत आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
यापूर्वी केले होते वादग्रस्त विधान
दरम्यान, एखाद्या वादात अडकण्याची डी.के. शिवकुमार यांची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांना नालायक म्हटलं होते. तसेच प्रवीण सूद हे भाजपासाठी काम करतात, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.