रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी हल्ला केला. या हल्ल्याला आता दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. अवघ्या काही दिवसांत युक्रेनवर ताबा मिळवू, असा दावा रशियाकडून करण्यात आला होता. मात्र युक्रेनने गेले दोन वर्ष रशियाचा कडवा प्रतिकार केला. रशियाची आतोनात मनुष्यहानी झाल्यानंतर आता आशिया खंडातील देशांमधून लोकांना नोकरीच्या नावाखाली रशियाच्या सैन्यात दाखल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी गुजरामधील २३ वर्षीय हेमिल मंगुकिया याचा युद्धभूमीवर युक्रेनच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर तेलंगणामधील मोहम्मद अफसान युवकाच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यानंतर भारतातून रशियात गेलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना आता आपल्या मुलांची काळजी वाटत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुबईहून थेट मॉस्को

कर्नाटकमधील पोलीस शिपाई सय्यद नवाझ अली यांचा मुलगा सय्यद इलियास हुसैनी (२२) रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये नोकरीसाठी गेला. पण तिथे गेल्यानंतर त्याला युक्रेनविरोधात युद्धात उतरविण्यात आले. फक्त हुसैनीच नाही तर त्याच्या मित्रानांही युक्रेनविरोधात लढण्यासाठी पाठविले गेले. आता या युवकांच्या गटाने भारत सरकारकडे त्याना युद्धभूमीतून बाहेर काढण्याची विनंती केली आहे.

अडीच लाख रुपये पगारासाठी रशियन सैन्यात गेला; युक्रेन युद्धात गुजराती तरुणाचा दुर्दैवी अंत

कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील मडबूल पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सय्यद नवाझ अली म्हणाले की, आम्ही कुणाकडे जावं आणि याबाबत कुणाला विनंती करावी, हे कळत नाहीये. पण आम्हाला आमचा मुलगा जिवंत परत हवा आहे. अली पुढे म्हणाले की, माझा मुलगा हुसैनी गेली काही वर्ष दुबईमध्ये काम करत होता. त्यानंतर एका एजंटने त्याच्याशी संपर्क साधून त्याला मॉस्कोमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले. हुसैनीला सिक्युरीटी गार्ड पदाची नोकरी देण्यात आली, ज्यासाठी त्याला ७० हजार रुपये वेतन दिले गेले.

अली पुढे म्हणाले, हुसैनी डिसेंबर महिन्यात काही दिवसांसाठी भारतात आला होता. गेल्या पाच दिवसांपासून आमचा त्याच्याशी संपर्क झालेला नाही. तो आमच्या संपर्कात नाही आणि तो जिवंत आहे की नाही? याची आम्हाला कल्पना नाही. मी सरकारला विनंती करतो की, आमच्या मुलाला वाचवा.

अली यांनी पोलीस उपायुक्तांना पत्र लिहून त्यांची व्यथा मांडली आहे. तसेच त्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या मुलाला परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. हुसैनीशी झालेल्या शेवटच्या संपर्कात तो म्हणाला होता की, त्याला आता सीमेवर आणण्यात आले आहे. आता कधीही त्याला युद्धभूमीवर पाठविले जाईल. तो कदाचित थोडा काळजीत होता, पण त्याने आम्हाला त्याची काळजी जाणवू दिली नाही.

मोहम्मद समीर अहमद (२३) हा तरूणही रशियात जाण्याआधी हुसैनीसह दुबई विमानतळावर हेल्पर म्हणून कार्यरत होता. अहमददेखील डिसेंबर महिन्यात भारतात कुटुंबीयांना भेटण्यासाठी आला होता. तेव्हा त्याचा भाऊ मुस्तफा याने रशियात धोका असल्याची काळजी व्यक्त केली. मात्र समीरने कुटुंबीयांची समजूत घातली. तो राजधानी मॉस्कोमध्ये काम करणार असून तिथे कोणताही धोका नाही, असे त्याने सांगितले होते. मात्र जसा तो रशियात पोहोचला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याला युद्धभूमीवर पाठविण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka cop worried about son stuck in russia ukraine war i want to see him come back alive kvg