Karnataka Mysore Crime News : कर्नाटकमधील म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विश्वेश्वरय्या नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये हसन चेतन (४५), चेतनची पत्नी रूपाली (४३), चेतनची आई प्रियमवधा (६२) आणि चेतनचा मुलगा कुशल (१५) अशा चार जणांचा समावेश आहे. घटनास्थळी चेतनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे, तर उर्वरित मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आले आहेत.

विश्वेश्वरय्या नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे संशयास्पद मृतदेह आढळून आल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अपार्टमेंटमधील शेजाऱ्यासह आजूबाजूच्या नागरिकांकडून पोलीस या कुटुंबीयांबाबत अधिक चौकशी करत आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने खून की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चेतनने आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना विष पाजल्याचा संशय पोलिसांना आहे. चेतनने कुटुंबीयांची विष प्राशन करून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत. ही घटना घडल्यानंतर म्हैसूर शहर पोलीस आयुक्त सीमा लाटकर, तसेच तेथील डीसीपी आणि विद्यारण्यपुरम पोलीस ठाण्याचे निरीक्षकांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबतची माहिती देताना सांगितलं की, “एकाच कुटुंबातील चार जणांचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहेत. चेतन हा कामगारांना सौदी अरेबियाला पाठवायचा. त्याने २०१९ मध्ये एक अपार्टमेंट विकत घेतलं होतं. त्याचा मुलगा १० वीत शिकत होता. तसेच चेतनचा भाऊ विदेशात आहे. मात्र, सोमवारी सकाळी त्याने मृत चेतनच्या पत्नीच्या पालकांना फोन करून अपार्टमेंटमध्ये येण्यास सांगितलं होतं. पण ते जेव्हा अपार्टमेंटमध्ये आले तेव्हा त्यांना हे मृतदेह आढळून आले.”

वृत्तानुसार, जीवन संपवण्यापूर्वी चेतनने अमेरिकेत राहणारा त्याच्या भावाला पहाटे ४ वाजता फोन केला होता. तसेच आम्ही जीवन संपवणार असं चेतनने कॉल डिस्कनेक्ट करण्यापूर्वी भावाला सांगितलं होतं. त्यानंतर अमेरिकेत राहणारा त्याच्या भावाने तातडीने चेतनच्या सासऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली आणि अपार्टमेंटमध्ये जाण्यास सांगितलं. मात्र, तोपर्यंत ही घटना घडली होती. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader