नुकताच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि जेडीएस या दोन्ही पक्षांना काँग्रेसने कर्नाटकात अस्मान दाखवलं. निवडणूक जिंकली तरी काँग्रेससमोरचा एक प्रश्न अद्याप सुटलेला नाही, तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा. कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अद्याप जाहीर केलेलं नाही. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन नेत्यांमध्ये कोण अधिक ताकदवान आहे यावर देशभरात चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांचं काँग्रेससाठी असलेलं योगदान, आतापर्यंतची राजकीय कारकीर्द आणि कर्नाटकच्या जनतेत असलेली प्रतिमा यावर चर्चा सुरू असताना या दोन्ही नेत्यांच्या मालमत्तेबाबतही चर्चा सुरू आहे. या दोघांमध्ये कोण अधिक श्रीमंत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर म्हणजे डीके शिवकुमार. कर्नाटकच्या या दोन नेत्यांमध्ये डीके शिवकुमार हे सिद्दरामय्यांपेक्षा अधिक श्रीमंत आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभेतून उभे हते. या मतदार संघात त्यांना ६०.९ टक्के मतं मिळाली आहेत. तर डीके शिवकुमार हे कनकपुरा मतदार संघातून उभे होते. त्यांनी या मतदार संघात एकतर्फी विजय मिळवत तब्बल ७५ टक्के मतं मिळवली आहेत.
डीके शिवकुमार यांनी त्यांच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे की, त्यांच्या कुटुंबाकडे एकूण १,४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात २७३ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यापैकी २४० कोटींची जंगम मालमत्ता एकट्या शिवकुमार यांच्या नावावर आहे. तर २० कोटींची मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे १,१४० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यातली ९७० कोटींची स्थावर मालमत्ता शिवकुमार यांच्या तर ११३ कोटींची मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे.
हे ही वाचा >> शिवकुमार ठाम, सिद्धरामय्यांची मोर्चेबांधणी; कर्नाटकातील कोंडी फोडण्यासाठी सोनिया दिल्लीत परतण्याची प्रतीक्षा
सिद्धरामय्यांची संपत्ती किती?
सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण ५१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यापैकी २१ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. तसेच दोघांच्या नावावर ३० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यापैकी सिद्धरामय्या यांच्याकडे ९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे २० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिद्धरामय्या यांच्या कुटुंबावर २३ कोटी रुपयांचं कर्जदेखील आहे.