Elderly Couple Dies By Suicide: सायबर चोरटे हे अनेकदा वृद्धांना लक्ष्य करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. डिजिटल ज्ञान अपुरे असल्यामुळे वृद्धांना लक्ष्य करणे सायबर चोरट्यांना सोपे जाते. यापूर्वी हजारो नागरिकांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे. ज्यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले. नुकतेच कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातही असेच एक प्रकरण घडले. मात्र या प्रकरणातील पीडित वृद्ध दाम्पत्याला सायबर चोरीचा धक्का पचवता आला नाही आणि त्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक झाल्यानंतर आणि सायबर चोरट्यांच्या धमक्यानंतर दियांगो नजरत (८३) यांनी स्वतःचा गळा चिरून तर त्यांच्या पत्नी प्लेइवियाना नजरत (७९) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. जोडप्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून त्यामध्ये आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे वृद्ध दाम्पत्याला संपर्क केला. वृद्ध दाम्पत्याच्या फोन क्रमाकांचा आणि ओळखपत्राचा वापर गुन्हेगारी कृत्यासाठी झाल्याचे सांगून त्यांना घाबरविण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितली. नजरत दाम्पत्य महाराष्ट्राच्या मंत्रालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी सायबर चोरट्यांना पाच लाख रुपये पाठवले.

तथापि, सायबर चोरट्यांनी दाम्पत्याचा छळ सुरूच ठेवला. वृद्ध दाम्पत्यानी आयुष्यभर कष्टाने कमावलेले ५० लाख रुपये चोरट्यांनी लांबवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याला मूलबाळ नाही, तसेच जवळचे नातेवाईकही नाहीत. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती कुणाला दिली नव्हती.

वृद्ध दाम्पत्य घरात मृतावस्थेत आढळल्यानंतर त्यांचा खून झाला असावा, असा सुरुवातीला पोलिसांचा संशय होता. मात्र नंतर आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून सर्व प्रकरण समोर आले. नांदगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माहिती देताना सांगितले की, वृद्ध दाम्पत्याचे मोबाइल ताब्यात घेतले असून आम्ही त्याचा तपास करत आहोत. तसेच बँक खात्यामधून किती रक्कम पाठवली गेली, याचेही माहिती घेत आहोत. हे खूप गंभीर प्रकरण असून आम्ही याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करू.