Man Arrested after Karnataka elderly couple suicide due to cybercrime : कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यांची सायबर गुन्हेगारांकडून जवळपास ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. दरम्यान या प्रकारणाचा तपास करत असलेल्या कर्नाटक पोलिसांनी आता याप्रकरणी गुजरात मधील एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव हे चिराग जीवराज भाई लक्कड असे असून तो सूरतचा रहिवासी आहे.
नेमकं काय झालं होतं?
२७ मार्च रोजी ८३ वर्षीय दियांगो नजरत (Diogjeron Nazareth) आणि त्यांची पत्नी ७८ वर्षीय प्लेइवियाना नजरत (Flaviana Nazareth) (७८) हे त्यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी मृत अवस्थेत आढळले होते. दिओगजेरोन यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती ज्यामध्ये त्यांनी सायबर गुन्हेगारांकडून फसवले गेल्याचा दावा केला होता. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा देखील त्यांच्या चिठ्ठीमध्ये उल्लेख करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणाच्या तपासादरम्यान दियांगो यांनी कथितरित्या २२ बँक खात्यांमध्ये ५९.६३ लाख रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती समोर आली होती.
या प्रकरणाच्या तपासाचा भाग असलेल्या एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, “अनेक व्यवहारांमधील आरटीजीएस व्यावहारापैकी ६,१०,००० रुपये हे बालाजी इंडस्ट्रीजच्या नावाने असलेल्या बँक खात्यात पाठवण्यात आले होते. पण अद्याप आम्हाला हे खाते असलेली कोणतीही नोंदणीकृत फर्म आढळली नाही.”
“लक्कड याने या फर्मीच्या अकाउंटशी लिंक असलेले सिम कार्ड त्याच्या फोनमध्ये टाकले आणि नेटबँकिंगच्या माध्यमातून इतर दोन खाद्यात पैसे पाठवले. असे दिसते की तो एका मोठ्या टोळीचा भाग आहे आणि कमिशनसाठी काम करत होता,” असे पोलीस अधिकार्याने सांगितले. तसेच त्यांनी या आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात असल्याचीही माहिती यावेळी दिली.
दियांगो हे मुंबईतील सचिवालयात काम करत होते आणि निवृत्त झाल्यानंतर ते बेळगाव येथील बिडी गावात स्थायिक झाले होते. पोलीसांनी असेही सांगितले की त्यांनी दोन मित्रांकडून ५ लाख रुपये आणि एका पुजार्याकडून ५०,००० रुपये उसणे घेतले होते आणि ७.१५ लाख रुपयांचे गोल्ड लोनही घेतले होते.