कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपाला अपयश आले आहे. त्यानंतर काही तासांतच काँग्रेस आणि जेडीएस युतीचे नवीन सरकार स्थापन होईल. याच पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश केलेले प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी या निवडणूकांबाबत भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये लोकशाहीचा विजय झाला, असे म्हटले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने काही वेळ मागितला असताना राज्यपालांनी भाजपाला दिलेली १५ दिवसांची मुदत ही लोकशाहीची थट्टा उडवणारी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाल्याने मी न्यायालयाचे आभार मानतो असेही ते चेन्नईमध्ये म्हणाले.

आपला राजकीय पक्ष तामिळनाडूतील आगामी निवडणूका लढवेल असे सुप्रसिद्ध स्टार रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुका लढवायच्या की नाही हे आम्ही निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ठरवू असे त्यांनी आता स्पष्ट केले. आतापर्यंत पक्षाची स्थापना झालेली नसली तरीही आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहोत असेही ते म्हणाले. कोणत्याही पक्षाशी युती करण्याबाबत आता वक्तव्य करणे घाईचे ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी ३१ डिसेंबर २०१७ रोजी, ‘मी राजकारणात प्रवेश करणे ही काळाची गरज आहे. प्रामाणिकपणा, काम आणि विकास या तीन गोष्टी आपल्या पक्षाचा मंत्र असेल. तसेच यासाठी आपल्याला जनतेचा १०० टक्के पाठिंबा मिळेल’ असे त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.

Story img Loader