माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी रामनगर व चिन्नापट्टणम या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवीत आहेत. रामनगरमध्ये ते विजयी होतील अशी चिन्हे आहेत. मात्र चिन्नापट्टणममध्ये भाजपच्या योगेश्वर यांच्याशी त्यांचा सामना आहे. येथे दोन्ही उमेदवारांना पन्नास-पन्नास टक्के संधी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळूरु ग्रामीणपासून रामनगर हा वेगळा जिल्हा कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री असताना केला. म्हैसूरकडे जाताना ६५ किमी अंतरावर या जिल्ह्य़ाचे ठिकाण आहे. एकूण चार तालुक्यांचा हा जिल्हा आहे. रामनगर शहरदेखील फार मोठे नाही. वोक्कलिंग समाजाचे ७० हजारावर मतदान आहे, त्यामुळे कुमारस्वामी निर्धास्त आहेत. अर्थात, मुख्यमंत्री असताना त्यांनी या भागात मोठय़ा प्रमाणात काम केल्याचे डॉ.एच.ए.रामा अय्यर यांनी सांगितले. सरकारी कार्यालये कुमारस्वामी यांच्या प्रयत्नाने येथे आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने त्यांच्या विरोधात इक्बाल हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. कुमारस्वामी येथून पराभूत होतील असा दावा काँग्रेस कार्यकर्ता मुथ्थुराम याने केला. गेल्या वीस वर्षांत त्यांनी येथे काहीच केले नाही. गरिबांना घरे नाहीत, युवकांना नोकऱ्या नाहीत अशा त्यांच्या तक्रारी होत्या. निवडणूक आली की त्यांना रामनगर आठवले, असा शेरा एका कार्यकर्त्यांने मारला. अर्थात, प्रिंटिंग व्यवसाय करणारे मुनिहम्मय्या यांनी मात्र कुमारस्वामींना येथे प्रचार करण्याची गरज नाही. त्यांचे काम उत्तम आहे, असे प्रशस्तीपत्रक दिले. या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. धरणे कमी आणि कालव्यांची व्यवस्था नाही, त्यामुळे पावसावरच अवलंबून रहावे लागते, असे त्यांनी सांगितले. या मतदारसंघात भाजपने लीलावती यांना उमेदवारी दिली आहे, मात्र अनेकांना त्या माहीत नाहीत, अशी स्थिती असल्याचे एकाने सांगितले. त्यामुळे काँग्रेस इक्बाल हुसेन यांच्याशीच कुमारस्वामी यांची लढत आहे. त्यात कुमारस्वामी बाजी मारतील, असे बहुसंख्य नागरिकांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष जनता दलाची धुरा सांभाळत असल्याने राज्यात इतरत्र कुमारस्वामी प्रचार करत आहेत. मतदारसंघात अर्ज दाखल करताना हत्ती आणून मोठे शक्तिप्रदर्शन त्यांनी केले होते, अशी आठवण एकाने सांगितली.

चिन्नापट्टणम येथे चुरस

  • कर्नाटकमध्ये तिघे जण दोन मतदारसंघांतून भाग्य अजमावत आहेत. त्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे चामुंडेश्वरी व बदामी, तर भाजप नेते व बेल्लारी ग्रामीणचे खासदार श्रीरामलू हे बागलकोटमधील बदामीबरोबरच चित्रदुर्ग जिल्ह्य़ातील मोलाकालमरु मतदारसंघातून उभे आहेत.
  • त्याचबरोबर कुमारस्वामी रामनगरबरोबरच लगतच्या चिन्नापट्टणम या मतदारसंघातूनही लढत आहेत. मात्र येथे त्यांचा सामना भाजपचे विद्यमान आमदार सी.पी.योगेश्वर यांच्याशी आहेत. एकेकाळचे अभिनेते असलेले योगेश्वर बहुतेक सर्व पक्षात फिरून आलेले आहेत.
  • काँग्रेसनेही येथे विधान परिषद सदस्य रेवण्णा यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे. या ठिकाणी दोन लाख १५ हजार मतदार असून, जवळपास ९० हजार वोक्कलिंग आहेत. मात्र कुमारस्वामी व योगेश्वर हे दोघेही वोक्कलिंग असल्याने त्यांच्यात ही मते विभागली जातील.
  • रेवण्णा हे कुरबा आहेत. याखेरीज २५ हजार मुस्लीम मतदार आहेत. ती काँग्रेस व जनता दलामध्ये विभागली जातील असे एका स्थानिक पत्रकाराने सांगितले.
  • इग्लुरु धरणाचे काम देवेगौडा पाटबंधारेमंत्री असताना मार्गी लावले, आता त्याचा लाभ स्थानिकांना होत आहे, त्याचा फायदा कुमारस्वामींना मिळेल, अशी माहिती सतीश या स्थानिक पत्रकाराने दिली.
  • अर्थात, योगेश्वर यांनी हे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले, तर काँग्रेस सरकारने निधी दिला. त्यामुळे तिघांचाही काही प्रमाणात या कामाला हातभार लागल्याचे सतीश यांनी सांगितले.
  • या मतदारसंघात तीनही उमेदवार बलाढय़ आहेत. त्यामुळे निकालाचा अंदाज लावणे कठीण असल्याचे स्थानिक पत्रकारांनी स्पष्ट केले.

देवेगौडांकडून मोदीस्तुती

राज्यात निवडणूक पश्चात भाजप-जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्या आघाडीची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते ही बाब वारंवार फेटाळून लावत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक दौऱ्याची सुरुवात करतानाच प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, जनता दलाचे ज्येष्ठ नेते एच.डी. देवेगौडांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. देवेगौडांचा राहुल यांनी अपमान केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता. त्यावर देवेगौडांनी मोदींनी मन वळविण्याने खासदार राहिलो असे वक्तव्य केले आहे. २०१४ मध्ये भाजपला बहुमत मिळाल्यास खासदारकी सोडून देईन, असे जाहीर मी केले होते. त्यानुसार भाजप सत्तेत आल्यावर खासदारकी सोडणार होतो, मात्र मोदींनी मन वळविले. एखाद्याचे मन वळविण्यात मोदी इतका वाकबगार माणूस मी पाहिला नाही, असे कौतुक देवेगौडांनी केले. अर्थात, पुन्हा एकदा भाजपशी युतीची शक्यता त्यांनी फेटाळली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka elections 2018 h d kumaraswamy bjp