Karnataka Former DGP Murdered in HSR Layout: कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश (६८) यांची राहत्या घरी हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारची असून बंगळुरूतील त्यांच्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे त्यांची पत्नी व मुलगी त्यावेळी घरातच होते. घरातल्या एका खोलीत त्या दोघींनी स्वत:ला कोंडून घेतलं होतं. पोलिसांना हत्येमध्ये ओम प्रकाश यांच्या पत्नीचा हात असल्याचा संशय असून त्यासंदर्भात चौकशीसाठी पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात न आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

ओम प्रकाश निवृत्तीनंतर बंगळुरूमध्ये स्थायिक झाले होते. बंगळुरूच्या एचएसआर लेआऊट भागात ते वास्तव्य करत होते. रविवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ओम प्रकाश यांच्या मुलाने यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

मृतदेहाजवळ सापडलं धारदार शस्त्र

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना मृतदेहाजवळ धारदार शस्त्र सापडल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरूचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. “त्याच शस्त्रानं ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे की नाही? यासंदर्भात आम्ही सविस्तर तपास करत आहोत”, असं विकास कुमार म्हणाले.

हत्येवेळी पत्नी व मुलगी बंगल्यातच!

दरम्यान, ओम प्रकाश यांची हत्या झाली, तेव्हा बंगल्यात त्यांची पत्नी पल्लवी व मुलगीही उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आली आहे. हत्या झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधी ओम प्रकाश यांची पत्नी व मुलीनं स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर या दोघींना बाहेर काढलं. यानंतर चौकशीसाठी पत्नी पल्लवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संपत्तीचा वाद हत्येसाठी कारणीभूत?

ओम प्रकाश यांच्या हत्येमागे संपत्तीचा वाद कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तरीदेखील हेच हत्येमागचं कारण होतं का? याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच, ओम प्रकाश यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातूनदेखील अधिक माहिती समोर येऊ शकेल, असं पोलिसांनी सांगितलं.

कोण होते ओम प्रकाश?

६७ वर्षीय ओम प्रकाश हे मूळचे बिहारचे होते. १९८१ साली ते आयपीएस सेवेत रुजू झाले. कर्नाटकमधील बेल्लारी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केली. कर्नाटकमधील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं. याव्यतिरिक्त ते लोकायुक्त पोलिस दलातही होते. शिवाय, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचे डिआयजी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. २०१५ साली त्यांनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. २०१७ साली ते निवृत्त झाले.