टोमॅटो सध्या १२०-२०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. शहरांनुसार टोमॅटोचे दर वेगवेगळे आहेत. एकीकडे टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे लोकांच्या खिशावर भार पडत आहे, अनेकांना टोमॅटो घेणं परवडत नाहीये. दुसरीकडे मात्र टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना या दरवाढीचा चांगला फायदा होत आहे. अनेक शेतकरी मंडईमध्ये लाखो रुपयांचे टोमॅटो विकत आहेत. कर्नाटकमधील कोलार येथील एका शेतकरी कुटुंबाने एका दिवसात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३८ लाख रुपयांचे टोमॅटो विकले.
विश्लेषण : भारतात टोमॅटो आला कुठून ? केव्हा ?
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी (११ जुलै) प्रभाकर गुप्ता व त्यांच्या भावांना टोमॅटोच्या २ हजार पेट्या ३८ लाख रुपयांमध्ये विकल्या. प्रभाकर गुप्ता आणि त्यांचे भाऊ ४० वर्षांपासून शेती करत आहेत. बेथमंगलामध्ये त्यांचे ४० एकर शेत आहे. “आम्ही चांगल्या दर्जाचे टोमॅटो पिकवतो. खतं आणि कीटकनाशकांबद्दल असलेल्या ज्ञानामुळे आम्हाला पीक कीटकांपासून सुरक्षित ठेवता येतं,” असं प्रभाकरचे चुलत भाऊ सुरेश गुप्ता म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी १५ किलोच्या बॉक्ससाठी गुप्ता यांना टोमॅटोचा सर्वात जास्त भाव ८०० रुपये मिळाला होता. मंगळवारी त्यांना १५ किलोसाठी १९०० रुपये मिळाले. टोमॅटो स्वस्त होत असल्याने कोलार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकवणं सोडून दिलं होतं. पण ज्यांच्या शेतात टोमॅटो होते, ते शेतकरी आता लखपती झाले आहेत.
एपीएमसी कोलार येथील केआरएस टोमॅटो मंडईचे सुधाकर रेड्डी टोमॅटोच्या दराबद्दल म्हणाले, “पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले आहेत. मंगळवारी मंडईत टोमॅटोचा लिलाव १९०० ते २२०० रुपये प्रति १५ किलोचा बॉक्स या दराने झाले. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये १५ किलोच्या बॉक्ससाठी २ हजार रुपये मिळाले होते.”