शोरूममध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला सेल्समनने अपमानित केले होते. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्याने एका तासांत गाडीची जेवढी किंमत होती, तेवढी रोख रक्कम आणून त्याच्या हातात ठेवली. त्यानंतर सेल्समनने माफी मागितली. अगदी चित्रपटाच्या कथेला साजेशी ही घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.
झालं असं की, केम्पेगौडा नावाचा एक शेतकरी हा बोलेरो पिकअप खरेदी करण्यासाठी गेला असता सेल्समनने त्याला उद्धटपणे वागणूक देत अपमानित केले आणि निघून जाण्यास सांगितले. सेल्समन म्हणाला, “या कारची किंमत १० लाख रुपये आहे आणि तुमच्या खिशात कदाचित १० रुपये देखील नसतील.” सेल्समनने त्यांना त्यांच्या दिसण्यामुळे शोरुमधून बाहेर काढले, असा आरोप शेतकरी आणि त्यांच्या मित्रांनी केला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलंय.
सेल्समनने दिलेल्या वागणुकीमुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर केम्पेगौडा यांनी सेल्समनला एका तासाच्या आत पैसे आणल्यास त्याच दिवशी एसयूव्हीची डिलिव्हरी करण्याची हिंमत आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर शेतकरी गेला आणि तासभरात पैसे घेऊन परतला. त्याला पाहून सेल्समनसह अधिकारी देखील स्तब्ध झाले. मुख्य म्हणजे ते गाडीची त्याच दिवशी डिलीव्हरी देऊ शकले नाही. कारण गाडी खरेदी करताना बरीच मोठी वेटिंग लिस्ट असते. त्यामुळे ४ दिवसांत गाडी पोहचवण्याची हमी शोरुमकडून देण्यात आली. तसेच त्यांची माफी देखील मागितली. परंतु “मला तुमच्या शोरूममधून कार घ्यायची नाही,” असं म्हणत शेतकरी त्याचे १० लाख रुपये घेऊन निघून गेला.
दरम्यान, शुक्रवारी कर्नाटकातील तुमकुरू येथील महिंद्रा शोरूममध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांना देखील ट्विटरवर टॅग केलंय.