Murder of Rretired Karnataka DGP Om Prakash : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येमुळे खळबळ माजली आहे. त्यांची पत्नी पल्लवी यांनीच ही हत्या केल्याचा दावा आहे. हत्येआधी पल्लवी यांनी हत्येसंदर्भात गुगलवर माहिती सर्च केली होती, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. हत्येआधी तब्बल पाच दिवस त्या माणसाच्या मृत्यूसंदर्भातील माहिती सर्च करत होत्या.

मानेजवळील नसा आणि रक्तवाहिन्या कापल्या तर माणसाचा मृत्यू कसा होतो, हे त्यांनी गुगलवर सर्च केले होते. रविवारी संध्याकाळी ओम प्रकाश यांचा बेंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी चाकूने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर लगेचच पल्लवी आणि त्यांची मुलगी कृती यांना ताब्यात घेण्यात आले. सोमवारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर पल्लवीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, तर कृतीला मानसिक तपासणीसाठी निमहंसमध्ये दाखल करण्यात आले.

सोमवारी संध्याकाळी, पोलिसांनी पल्लवीला चौकशीसाठी घटनास्थळी नेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी केली असता पल्लवी यांनी कौटुंबिक छळ झाल्याचा दावा केला आहे. चाकूहल्ला करण्यापूर्वी, पल्लवीने व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये मेसेज शेअर केले होते, ज्यात असा दावा केला होता की तिला तिच्याच घरात ओलीस ठेवण्यात आले होते आणि सतत देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. या मेसेजमध्ये तिने वारंवार विषबाधा झाल्याचा आरोप केला आणि तिच्या मुलीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.

मालमत्तेच्या हव्यासापोटी कौटुंबिक छळ

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, “मी आणि माझी मुलगी कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलो आहोत. त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पारंपरिक नसून अत्यंत आधुनिक आहेत”, असे मेसेज त्यांनी पाठवले होते. तसंच, “माझ्या मुलाकडे रिव्हॉल्व्हर आणि रायफल आहेत ज्या ताबडतोब जप्त कराव्यात किंवा काढून घ्याव्यात. या सर्व घटना मालमत्तेच्या हव्यासापोटी आहेत. माझा नवरा माझ्या मुलाला आणि सुनेला पाठिंबा देत आहे”, असंही एका मेसेजमध्ये म्हटल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद आहे.

बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी या हाय-प्रोफाइल खून प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे (सीसीबी) सोपवला आहे. सीसीबी आज अधिकृतपणे तपास हाती घेईल.