स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात संस्थानांचा भाग वगळता प्रशासकीय सोईकरता, कारभाराकरता इंग्रजांनी प्रातांची निर्मिती केली होती. यामध्ये बॉम्बे, बंगाल, मद्रास, पंजाब असे विविध प्रांत होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५६ नंतर भाषेवर आधारीत विविध राज्यांची निर्मिती देशामध्ये झाली. कन्नड भाषिकांसाठी म्हैसुर राज्याची निर्मिती झाली, १९७३ ला या राज्याचे नामकरण कर्नाटक असं झालं.
बेळगाव, कारवार, धारवाड आणि विजापूर हे भाग स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांतात होते. कर्नाटक राज्याची निर्मिती झाल्यानंतरही आजही या भागाची ओळख ही ‘मुंबई कर्नाटक’ म्हणून कायम होती. यामुळेच ही ओळख पुसण्याकरता कर्नाटक सरकारने मुंबई कर्नाटक भागाचे नामांतर ‘कित्तुर कर्नाटक’ असं केलं आहे. नामांतर करण्याबाबतची प्रशायकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्नाटक सरकारने ही घोषणा आज केली. याआधी ‘हैद्राबाद कर्नाटक’ प्रांताचे नामाकरण ‘कल्याणा कर्नाटक’ असं करण्यात आलं होतं.