Petrol Diesel Rates In Karnataka : कर्नाटक सरकारने डिझेलवर असलेल्या विक्री करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डिझेलच्या दरात आता प्रति लिटर २ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी महागाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. मात्र, कर्नाटक सरकारच्या या निर्णयावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच डिझेलच्या दरात एवढी वाढ करूनही कर्नाटकात डिझेलचे दर अजूनही दक्षिण भारतात असलेल्या डिझेलच्या दरांपेक्षा कमी असल्याचा दावा कर्नाटक सरकार करत आहे.
कर्नाटक सरकारने आज १ एप्रिलपासून डिझेलवरील विक्री कर (KST) १८.४४ टक्क्यावरून आता २१.१७ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता डिझेलच्या दरात प्रति लिटर २ ते २.७५ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या कर्नाटकात डिझेलचा दर ९१.०२ रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर १०२.९२ रुपये प्रति लिटर एवढा आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, आता डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यातच काही दिवसांपूर्वी मालमत्ता कर, वीज दर आणि दुधाचे दर वाढले होते. त्यामध्ये आता डिझेलच्या किंमतीही वाढल्यामुळे कर्नाटकातील जनतेवरील आर्थिक भार आता आणखी वाढणार आहे. मात्र, तरीही कर्नाटक सरकारने या कर वाढीचा बचाव केला आहे. तसेच कर वाढीच्या माध्यमातून मिळणारा अतिरिक्त महसूल पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि सार्वजनिक कल्याणकारी योजनांसाठी उपयोग केला जाईल असं सांगितलं जात आहे.
कर्नाटकातील डिझेलचे दर शेजारच्या राज्यांपेक्षा कमी आहेत. ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या आकडेवारूनुसार तामिळनाडूतील होसूर येथे डिझेलची किंमत प्रति लिटर ९४.४२ रुपये आहे. तसेच केरळमधील कासरगोड येथे ९५.६६ रुपये आहे, तर आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे ९७.३५ रुपये आहे, तर तेलंगणातील हैदराबादमध्ये ९५.७० रुपये आणि महाराष्ट्रातील कागलमध्ये ९१.०७ रुपये आहेत, असं वृत्तात म्हटलं आहे.