Karnataka High Court: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. श्रीशानंद यांनी बंगळुरूमधील एका मुस्लिम बहुल परिसराला ‘पाकिस्तान’ म्हटल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पश्चिम बंगळुरूमधील गोरी पाल्या या परिसराला न्यायाधीशांनी पाकिस्तान असं संबोधलं होतं. विम्याशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी घेत असताना न्यायाधीशांनी ही टिप्पणी व्यक्त केली होती. २८ ऑगस्ट रोजी भाडे नियंत्रण कायद्याबाबत बोलत असताना न्यायाधीशांनी ही टिप्पणी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ बार अँड बेंच या संकेतस्थळाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. भाडे नियंत्रण कायदा आणि मोटार वाहन कायद्यात दुरूस्ती करण्याबाबत न्यायाधीश सांगत होते. विदेशातील वाहनं कशापद्धतीने नियमांचं पालन करतात आणि एका रांगेत वाहनं उभी करून शिस्त पाळतात, तसेच वेग मर्यादेचेही कसे पालन केले जाते, याबाबत न्यायाधीशांनी माहिती दिली.

“तुम्ही म्हैसूर मार्गावर जाऊन बघा. प्रत्येक रिक्षात १० माणसे भरली जातात. म्हैसूर मार्ग भारतात नसून पाकिस्तानात आहे का? हेच आपल्या व्यवस्थेचं वास्तव आहे. तुम्ही त्याठिकाणी कितीही कडक पोलीस अधिकारी नेमा. ते फक्त तिथे मारझोड करण्याचे काम करतात”, असे विधान न्यायाधीशांनी केल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचा >> अटकेतील आरोपीचा न्यायालयालाच गंडवण्याचा प्रयत्न; न्यायमूर्ती संतापून म्हणाल्या, “याच्यावर तातडीने…”

न्यायाधीश नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

वाहतुकीच्या शिस्तीबाबत बोलताना न्यायाधीश श्रीशानंद म्हणाले की, अवजड वाहनांनी त्यांना नेमून दिलेल्या रांगेतच राहायला हवं. वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे, असे न्यायाधीशांनी सुचविले.

वाहतुकीच्या नियमांची मोडतोड, न्यायाधीशांचा संताप

“तुम्ही विदेशात जाऊन बघा. तिथं जर तुम्ही वाहनाचा वेग ४० किमी प्रति तास ठेवून वाहन चालवत असाल तर पोलीस तुम्हाला कमी वेगाच्या लेनमध्ये जाण्यास सांगतात. इथं मात्र वाहनचालक आपल्या मनाला वाटेल, त्या वेगानं वाहन चालवतात. त्यांना कायदा वैगरेशी काहीही देणंघणं नसतं. याउपर हास्यास्पद गोष्ट अशी की, तुम्ही कोणत्याही खासगी शाळेत जाऊन बघा. तिथे विद्यार्थी हमखासपणे स्कुटरवर प्रवास करताना दिसतात. मुख्याध्यापकांनाही याचं काहीच वाटत नाही. ते कारवाई करत नाहीत, पालकांनाही याचं काहीच वाटत नाही. ऑटोरिक्षातही १० ते १५ विद्यार्थी कोंबलेले असतात. अशाच एका व्हॅनमध्ये गुदमरून तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. पण याचं कुणालाही काही वाटत नाही. पोलिसही यावर निष्क्रियता दाखवितात”, असा संताप व्यक्त केल्यानंतर न्यायाधीश श्रीशानंद यांनी बंगळुरूमधील त्या परिसराला पाकिस्तानची उपमा दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka high court justice v srishananda refers to bengaluru locality as pakistan sparks outrage on social media kvg