मुस्लीम मुलींना शाळा किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी द्यावी की नाही? याविषयी सध्या मोठी चर्चा सुरू असून हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात यासंदर्भात सध्या सुनावणी सुरू असून यासंदर्भात न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्था किंवा विद्यार्जनाच्या ठिकाणी धार्मिक पेहेराव करण्याचा आग्रह धरू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशांवर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
कर्नाटकच्या उडुपीमध्ये बुरखा परिधान करण्यावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. बुरखा किंवा हिजाब घालून महाविद्यालयात येणाऱ्या काही विद्यार्थिनींना कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. तिथून या प्रकरणाला सुरूवात झाली आहे. यानंतर या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.
हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना कर्नाटकमध्ये सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.
यानंतर या मुद्द्यावरून समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही महाविद्यालयात जात असताना काही विद्यार्थी भगव्या रंगाचं उपरणं हातात घेऊन ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहेत. ही मुलगी पुढे कॉलेजच्या इमारतीमध्ये जाताना देखील ही मुलं मुलीच्या मागोमाग घोषणा देताना जात असल्याचं दिसत आहे. पुढे आल्यानंतर ही मुलगी देखील नंतर अल्ला हो अकबर अशा घोषणा देताना दिसत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावरून देखील राजकारण पेटलं आहे.