अटक न करण्याचे पण, गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश
पीटीआय, बंगळूरु : ‘आज तक’ या वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक सुधीर चौधरी यांना अटक करू नये असे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मात्र, त्याच वेळी आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला स्थगिती द्यावी ही चौधरी यांची मागणी न्यायालयाने अमान्य केली. सकृतदर्शनी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येईल असे दिसते आणि या प्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
कर्नाटक अल्पसंख्याक विकास महामंडळाने दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देणारी चौधरी यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत त्यांना कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करू नये असे निर्देश न्या. हेमंत चंदनगौडर यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने दिले.
चौधरी यांच्या विरोधात एफआयआर का?
कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनेवर सुधीर चौधरी यांनी आपल्या कार्यक्रमात टीका केली होती. कर्नाटकात केवळ मुस्लिमांना लाभ पुरवणारी योजना आहे, बुहसंख्याक हिंदूंना योजनांचे लाभ मिळत नाहीत असा आरोप त्यांनी केला होता. तर, कर्नाटकात विविध समुदायांसाठी विविध योजना आहेत. हिंदू समाजातील घटकांसाठी विविध योजना आहेत असा खुलासा राज्य सरकारकडून करण्यात आला. यानंतर चौधरी, तसेच ‘आजतक’ वाहिनीचे संपादक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.