महिला सशक्तीकरणाच्या चर्चा वारंवार होताना दिसतात. मात्र, अद्याप महिलांवर होणारे अत्याचार, महिलांविरोधातील गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. बेळगावमधल्या अशाच एका प्रकरणामुळे ही बाबत तीव्रतेनं अधोरेखित झाल्याचं दिसून आलं. कर्नाटक उच्च न्यायालयाने बेळगावमध्ये घडलेल्या या प्रकरणाची स्वत: दखल घेऊन (स्यूमोटो) कर्नाटक सरकार व पोलिसांची कानउघाडणी केली. तसेच, इतक्या हीन पद्धतीने महिलांना वागणूक मिळत असताना पोलीस कुठे होते? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बेळगावमध्ये ११ डिसेंबर रोजी एक तरुणी आपल्या साखरपुड्याच्या दिवशी त्याच गावात राहणाऱ्या तिच्या प्रियकरासमवेत पळून गेली. याचा राग तरुणीच्या कुटुंबीयांना आल्यानंतर त्यांनी थेट त्या तरुणाच्या घरी धाव घेतली. त्याच्या आईला बेदम मारहाण केली. तसेच, या महिलेची नग्नावस्थेच धिंड काढून तिला एका विजेच्या खांबाला तब्बल दोन तास बांधून ठेवण्यात आलं. या प्रकरणामुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची उच्च न्यायालयाने दखल घेत प्रशासन व्यवस्थेला परखड शब्दांत सुनावलं आहे.
काय म्हटलं न्यायालयाने?
कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराले आणि न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने संतप्त टिप्पणी करत पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले. “अशा घटनांनंतर देशाच्या इतर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असेल. असा प्रकार महाभारतातही घडला नव्हता. द्रौपदीसाठी भगवान कृष्ण धावून आले होते. पण सध्याच्या आधुनिक युगामध्ये तिच्या मदतीसा कुणीही धावून आलं नाही. दुर्दैवाने हे जग दुर्योधन व दु:शासनांचं आहे”, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी आपला उद्वेग व्यक्त केला.
दोन तास महिलेला खांबाला बांधून ठेवलं!
दरम्यान, आधी मारहाण, नंतर नग्न धिंड काढल्यानंतर या महिलेला दोन तास वीजेच्या खांबाला बांधून ठेवण्यात आलं. यावरून न्यायालयाने संताप व्यक्त केला. “त्या महिलेला त्या दानवांच्या दयेवर सोडून देण्यात आलं होतं. कल्पना करा त्या महिलेला या सगळ्याचा किती मोठा धक्का बसला असेल. आपण जोपर्यंत त्या महिलेच्या जागी स्वत:ला ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जाणवणार नाही. आरोपींना माणूस म्हणायची मला लाज वाटतेय. कुणी इतकं क्रूर कसं होऊ शकतं?” असा उद्विग्न सवाल न्यायालयाने यावेळी केला.
न्यायालयाचे आदेश…
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने पोलिसांना फटकारलं. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी दोन तास का लागले? असा सवालही न्यायालयाने केला. यासंदर्भात थेट पोलीस आयुक्तांना न्यायालयासमोर या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, हे प्रकरण अत्यंत कठोरपणे हाताळलं जाईल, असा सज्जड दम न्यायालयाने प्रशासन व आरोपींना दिला.