Karnataka High Court Alimony Case Proceedings Video Viral : घटस्फोटाच्या एका प्रकरणात पत्नीने मुलाच्या पालनपोषणासाठी पतीकडून मिळवलेली रक्कम पाहून कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या प्रकरणातील व्यक्ती महिन्याला १२ हजार रुपये कमावते व त्याच्या मुलाच्या पालनपोषणासाठी पत्नीला दरमाहा १० हजार रुपये देत असल्याचं न्यायमूर्तींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्का बसला. न्यायालयीन कामकाजादरम्यानचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायमूर्ती म्हणाल्या, एखादी व्यक्ती महिन्याला १२ हजार रुपये कमवत असेल, तर तो माणूस दर महिन्याला पत्नीला मुलाच्या पालनपोषणासाठी १० हजार रुपये कसे देणार? न्यायालयाने (कनिष्ठ) कोणत्या आधारावर त्या व्यक्तीला १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले? उरलेल्या दोन हजार रुपयांमध्ये तो त्याचा उदरनिर्वाह कसा करेल? तो कसा जगेल? तुम्ही (पत्नी) मुलाच्या संगोपनासाठी १० हजार रुपये मिळवण्यासाठी पात्र आहात हे ठरवण्यासाठी न्यायालयासमोर कोणता पुरावा आहे? मान्य आहे, तुमच्या काही गरजा आहेत, न्यायालय ही बाब समजू शकतं. परंतु, तुम्हाला पैसे मात्र तोच माणूस देणार आहे जो महिन्याला केवळ १२ हजार रुपये कमावतोय.

खटल्याच्या सुरुवातीला पत्नीचे वकील न्यायमूर्तींना म्हणाले की, “पत्नीला पोटगी मिळावी यासाठी आम्ही याचिका दाखल केली आहे. पत्नीला काहीही दिलं जात नाही. केवळ मुलाच्या पालनपोषणासाठी १० हजार रुपये मंजूर झाले आहेत. तेवढेच पैसे मिळत आहेत”. यावर न्यायमूर्तींनी पत्नीच्या वकिलांना प्रश्न विचारला की “पतीचा पगार किती आहे?’ त्यावर पत्नीचे वकील म्हणाले, “६२ हजार रुपये”. मात्र पतीच्या वकिलांनी सांगितलं की “त्याचा पगार १८ हजार रुपये (ग्रॉस सॅलरी) इतका आहे. त्यापैकी त्याला दर महिन्याला १२ हजार रुपये (इन हँड सॅलर) मिळतात”. त्यावर न्यायमूर्ती म्हणाल्या, “हाती आलेल्या पगारातील १० हजार रुपये पत्नीला दिल्यानंतर तो जगणार कसा?”

हे ही वाचा >> Pooja Bhatt : “आमचा गौरवशाली महाराष्ट्र…”, गोमांस बाळगल्याच्या संशयातून वृद्धाला झालेली मारहाण पाहून पूजा भट्ट हळहळली

दरम्यान, न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं की पतीचा पगार वाढला असेल तर पत्नी बालसंगोपनासाठी मिळणारी रक्कम वाढावी यासाठी स्वतंत्र अर्ज करू शकते.

“…म्हणून मी लग्नच करत नाही”, घटनेचा व्हायरल व्हिडीओ पाहून एक्सवर लोकांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, कोर्टातील कामकाजाचा (या खटल्याचा) व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एका युजरने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर प्रश्न विचारला आहे की “एखादा माणूस बेरोजगार झाला, त्याची नोकरी गेली तर तो बालसंगोपनासाठी किंवा पोटगी म्हणून कसे व किती पैसे देणार?” त्यावर एकाने उत्तर दिलं आहे की “ईएमआयचा पर्याय आहे, कर्ज काढून पैसे द्यावे”. आणखी एका युजरने यावर कमेंट केली आहे की “हे सगळं बघूनच मी लग्न करत नाही. एकाच माणसाने दोन-दोन कुटुंबं कशी सांभाळायची? आणि प्रत्येक वेळी पुरुषानेच पैसे का द्यायचे. स्त्रिया आता पुरुषांपेक्षा जास्त कमावत्या झाल्या आहेत, तरीदेखील पुरुषांकडून पोटगी का घेतली जाते?”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka high court surprise as man earns 12000 rs ordered to pay rs 10000 for childcare asc