हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


धमकी देणाऱ्या दोन आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तिरुनेलवेली येथे कोवई रहमतुल्लाला अटक करण्यात आली, तर ४४ वर्षीय एस जमाल मोहम्मद उस्मानी याला तंजावरमध्ये ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने हिजाब प्रकरणी निर्णय देताना वर्गात हिजाब घालण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे.

हेही वाचा – हिजाब बंदीवर निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ


कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अॅड. उमापती एस यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार उमापती यांनी तक्रारीत न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये झारखंडमधील न्यायाधीशांच्या खुनाचा संदर्भ देण्यात आला आहे. पहाटे मॉर्निग वॉकसाठी गेल्यानंतर या न्यायाधीशांचा खून करण्यात आला होता. अगदी अशाच पद्धतीने कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अवस्थी यांचा खून करण्याची धमकी या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे, असे तक्रारदारने म्हटले आहे.


त्याचबरोबर खून करण्याची धमकी देणाऱ्याने न्यायमूर्ती फिरायला कोठे जातात याची माहिती असल्याचं सांगितलंय. न्यायाधीशांनी त्यांच्या परिवारासोबत उडपी मठाला भेट दिली होती. या भेटीचा उल्लेखही धमकी देणाऱ्या व्यक्तीने केलाय. हा व्हिडीओ तामिळनाडूमधील मदुराई येथे शूट करण्यात आल्याची माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka hijab row judges who delivered verdict to get y category security vsk
Show comments