Karnataka Honey Trap : कर्नाटकमधील एक मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनी एक मोठा दावा केला आहे. एका केंद्रीय नेत्यांसह जवळपास ४८ नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत, असा दावा सहकार मंत्री के.एन.राजन्ना यांनी केला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी यासंदर्भातील विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावरून आता कर्नाटकात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून चांगलंच राजकारण तापलं आहे.
कर्नाटक सरकारमधील सहकार मंत्री के.एन.राजन्ना यांनी विधानसभेत बोलताना केलेल्या दाव्यानंतर विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, के.एन.राजन्ना यांनी यावेळी हा मुद्दा देखील स्पष्ट केलं की, हनी ट्रॅपचा हा मुद्दा कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नाही. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
मंत्री के.एन.राजन्ना म्हणाले की, “माझ्या माहितीनुसार काही सीडी आणि पेन ड्राइव्हचे बळी एक-दोन नव्हे तर सुमारे ४८ लोक पडले आहेत. जेव्हा मी एक म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त माझ्या बाजूचे लोक असा नाही, तर तिकडचे (विरोधी पक्षाकडे इशारा करत) देखील यामध्ये सामील आहेत. सभापती महोदय, कर्नाटकला सीडी आणि पेन ड्राइव्हची फॅक्टरी असल्याचा अनेकजण गंभीर आरोप करत आहेत. तसेच तुमकुरु येथील दोन मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप केला जात आहे. आता मी तुमकुरु येथील मंत्र्यांपैकी एक आहे आणि आणखी एक. पण अशा प्रकारचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मी त्यावर सभागृहात उत्तर दिलं तर ते योग्य ठरणार नाही”, असंही मंत्री के.एन.राजन्ना यांनी स्पष्ट केलं.
मंत्री के.एन.राजन्ना यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असून याबाबत चौकशीची मागणी करणार आहेत. यामागे निर्माते कोण? यात सहभागी दिग्दर्शक कोण? हे सर्व बाहेर आलं पाहिजे. लोकांना देखील कळलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, मंत्री के.एन.राजन्ना यांचे पुत्र आमदार राजेंद्र यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, “गेल्या सहा महिन्यांपासून अनेक नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. आताच कॅबिनेट मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण देत चौकशीची मागणी केली. त्यामुळे मला वाटतं की गृहमंत्री या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील.”
काँग्रेस नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वी कर्नाटकच्या एका मंत्र्यावर दोन वेळा हनी ट्रॅपचा प्रयत्न झाल्याची पुष्टी केली होती. ते म्हणाले की, “राज्यात हनी ट्रॅप ही नवीन गोष्ट राहिली नाही. काही व्यक्ती राजकारणासाठी याचा वापर करतात. एका मंत्र्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. तथापि तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, कर्नाटकमध्ये हनी ट्रॅपिंग ही काही नवीन गोष्ट राहिली नाही. मात्र, हे थांबलं पाहिजे”, असं जारकीहोळी म्हणाले.
डीके शिवकुमार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मात्र त्यांच्या उत्तरात सावधगिरी बाळगली. ते म्हणाले, “कोणाला अटक झाली आहे की नाही हे मला माहित नाही. चौकशी होऊ द्या. मी गृहमंत्र्यांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना करतो”, असं उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटलं.
कर्नाटकचे गृहमंत्री काय म्हणाले?
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी याबाबत सांगितलं की, आरोपांबाबत आपल्याला माहित नाही. पण मी विभागाकडून माहिती मागेन. आतापर्यंत कोणीही आम्हाला काहीही सांगितलं नाही. मला या सर्व गोष्टी माहित नाहीत. विभागाने आम्हाला कळवल्यावरच मला याबाबत योग्य ते बोलता येईल. मी विभागाला माहिती देण्यास सांगेन,” असं ते म्हणाले.
भाजपाने केली चौकशीची मागणी
विरोधी पक्षनेते आर.अशोक यांनी या प्रकरणाची चौकशी विद्यमान न्यायाधीशांकडून करावी अशी मागणी केली. तसेच सरकारला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहन त्यांनी केलं. “हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी विद्यमान न्यायाधीशांकडून होऊ द्या. आपण ते गांभीर्याने घेतले पाहिजे. गृहमंत्र्यांनी ते कोणत्या प्रकारची चौकशी करणार आहेत हे जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी केली.