Karnataka IPS Officer Clash : कर्नाटकमधील आयपीएस अधिकारी वर्तिका कटियार या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांचा त्यांच्याच विभागातील आयपीएस अधिकारी रुपा डी मौदगील यांच्याशी वाद झाल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे हे दोन्ही अधिकारी कर्नाटकच्या अंतर्गत सुरक्षा विभागात (ISD) एकाच विभागात कार्यरत आहेत. आयपीएस अधिकारी वर्तिका कटियार यांचा आरोप आहे की,आयपीएस अधिकारी रुपा डी यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या परवानगीशिवाय गुप्त कागदपत्रे ठेवली. याबाबत त्यांनी मुख्य सचिव रजनीश आणि पोलिस महासंचालक आलोक मोहन यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर या वादाची मोठी चर्चा झाली.
दरम्यान, दोन आयपीएस अधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्यामुळे या वादाची राज्यात मोठी चर्चा रंगली. यानंतर अखेर कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आणि आज आयपीएस अधिकारी वर्तिका कटियार यांची बदली करण्यात आली आहे. आयपीएस वर्तिका कटियार यांनी डी.रूपा मुदगिल यांच्यावर इतर विभागांशी संबंधित गोपनीय कागदपत्रे त्यांच्या चेंबरमध्ये ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यानंतर कर्नाटक सरकारने वर्तिका कटियार यांची अंतर्गत सुरक्षा विभागातून बदली केली. कर्नाटक सरकारने सोमवारी यासंदर्भातील आदेश जारी केले. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
वर्तिका कटियार व रूपा मौदगिल या सध्या इंटर्नल सर्व्हिस डिव्हिजनमध्ये (ISD) नियुक्त आहेत. रूपा मौदगिल या आयएसडीमध्ये पोलीस महासंचालक म्हणून तर वर्तिका कटियार पोलीस उपमहासंचालक पदावर नियुक्त होत्या. २० फेब्रुवारी रोजी वर्तिका कटियार यांनी कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याकडे रूपा मौदगिल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची प्रत राज्याचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनाही पाठवली होती. मौदगिल या २००० बॅचच्या आयपीएस अधिकारी असून वर्तिका कटियार २०१० सालच्या आयपीएस अधिकारी आहेत.
काय आहे तक्रारीत?
वर्तिका कटियार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत ६ सप्टेंबर २०२४ रोजी घडलेल्या एका घटनेचा दाखला देण्यात आला आहे. या तक्रारीनुसार, हवालदार मंजुनाथ टी. एस. व होम गार्ड मल्लिकार्जुन हे या दिवशी वर्तिका कटियार यांच्या कार्यालयात शिरले. रूपा मौदगिल यांच्या निर्देशांनुसार या दोघांनी काही महत्त्वाच्या फाईल्स वर्तिका कटियार यांच्या कार्यालयात ठेवल्या. तसेच, त्याचे फोटोदेखील काढले. हे फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात आले होते, असा दावाही कटियार यांनी केला. कार्यालयात शिरण्यासाठी या दोघांनी कंट्रोल रूमकडे असणाऱ्या चावीचा वापर केल्याचं कटियार यांनी नमूद केलं आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल मला हल्लीच समजलं. याआधीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण त्यातली ही घटना मला समजली. भविष्यात जर असं काही पुन्हा घडलं आणि काही गैरप्रकार घडला तर त्यासाठी पूर्णपणे डी. रूपा याच जबाबदार असतील”, असंही कटियार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.