दोन वर्षांपूर्वी कर्नाटकमधील वरीष्ठ आयपीएस अधिकारी डी. रूपा मौदगिल एका वादामुळे चर्चेत आल्या होत्या. आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्याशी जाहीरपणे झालेल्या वादानंतर आता पुन्हा एकदा डी. रूपा या चर्चेत आल्या आहेत. यंदा त्यांच्याच विभागातील कनिष्ठ आयपीएस अधिकारी पोलीस उपमहासंचालक वर्तिका कटियार यांनी डी. रूपा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून डी. रूपा यांनी आपल्या कार्यालयात काही फाईल्स ठेवून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा वर्तिका कटियार यांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

वर्तिका कटियार व रूपा मौदगिल या सध्या इंटर्नल सर्व्हिस डिव्हिजनमध्ये (ISD) नियुक्त आहेत. रूपा मौदगिल या आयएसडीमध्ये पोलीस महासंचालक म्हणून तर वर्तिका कटियार पोलीस उपमहासंचालक पदावर नियुक्त आहेत. २० फेब्रुवारी रोजी वर्तिका कटियार यांनी कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याकडे रूपा मौदगिल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची प्रत राज्याचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनाही पाठवण्यात आली आहे. मौदगिल या २००० बॅचच्या आयपीएस अधिकारी असून वर्तिका कटियार २०१० सालच्या आयपीएस अधिकारी आहेत.

काय आहे तक्रारीत?

वर्तिका कटियार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत ६ सप्टेंबर २०२४ रोजी घडलेल्या एका घटनेचा दाखला देण्यात आला आहे. या तक्रारीनुसार, हवालदार मंजुनाथ टी. एस. व होम गार्ड मल्लिकार्जुन हे या दिवशी वर्तिका कटियार यांच्या कार्यालयात शिरले. रूपा मौदगिल यांच्या निर्देशांनुसार या दोघांनी काही महत्त्वाच्या फाईल्स वर्तिका कटियार यांच्या कार्यालयात ठेवल्या. तसेच, त्याचे फोटोदेखील काढले. हे फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात आले होते, असा दावाही कटियार यांनी केला आहे. कार्यालयात शिरण्यासाठी या दोघांनी कंट्रोल रूमकडे असणाऱ्या चावीचा वापर केल्याचं कटियार यांनी नमूद केलं आहे.

“या सगळ्या प्रकाराबद्दल मला हल्लीच समजलं. याआधीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण त्यातली ही घटना मला समजली. भविष्यात जर असं काही पुन्हा घडलं आणि काही गैरप्रकार घडला तर त्यासाठी पूर्णपणे डी. रूपा याच जबाबदार असतील”, असंही कटियार यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केलं आहे.

नकारात्मक अहवालाची धमकी

दरम्यान, डी. रूपा मौदगिल यांनी आपल्या कामगिरीबाबत नकारात्मक अहवाल पुढे पाठवण्याची धमकीही आपल्याला दिली होती, असा आरोप कटियार यांनी केला आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता या दोघींनीही मेसेजेस व कॉल्सला उत्तर दिलेले नाही.

काय घडलं होतं २०२३ साली?

दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे डी. रूपा मौदगिल यांचा आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्याशी वाद चव्हाट्यावर आला होता. २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यातच रोहिणी सिंधुरी यांचे काही खासगी फोटो डी. रुपा यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याचा दावा रोहिणी सिंधुरी यांनी केला होता. त्याशिवाय, काही पुरुष अधिकाऱ्यांनाही हे फोटो पाठवण्यात आलाचं सिंधुरी यांचं म्हणणं होतं. हा वाद थेट न्यायालयापर्यंत गेला असून सध्या न्यायप्रविष्ट आहे.

Story img Loader