IT company work time 14 Hour Shift : कर्नाटक हे आयटी कंपन्यांचे हब मानले जाते. बंगळुरूमध्ये अनेक आयटी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. जगभरातील आयटी प्रोफेशनल याठिकाणी काम करतात. आता कर्नाटकमधील आयटी कंपन्यांचा एक निर्णय वादात अडकला आहे. येथील आयटी कंपन्यांनी कर्नाटक सरकारला कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस १४ तासांचा करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाचा आता कामगार संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, तसेच यातून पुन्हा एकदा गुलामगिरीची परिस्थिती ओढवेल, अशी भीती कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकार “कर्नाटक दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना कायदा, १९६१” या कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमधील आयटी कंपन्यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस १४ तासांचा करण्यात यावा. यामध्ये १२ तासांची शिफ्ट आणि दोन तासांचा ओव्हरटाइम अशी विभागणी असेल.

हे वाचा >> ”तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करावे; तर देशाची…”; नारायण मूर्ती यांचा युवा पिढीला सल्ला

भारतातील कामगार कायद्यानुसार, कामगारांना ९ तासांची शिफ्ट करण्याचा नियम आहे. त्याउपर जर काम करावे लागले, तर तो ओव्हरटाइम म्हणून ग्राह्य धरला जावा, अशी तरतूद आहे. कर्नाटकमधील आयटी कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले की, आयटी, बीपीओ या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रतिदिन १२ तास काम करण्याची परवानगी दिली जावी.

आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी राज्य सरकारबरोबर प्राथमिक बैठक घेऊन यावर चर्चा केली आहे. थोड्याच दिवसांत राज्य सरकार यावर निर्णय घेऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते.

कामगार संघटनांकडून विरोध

दिवसाला १४ तास काम करण्याच्या प्रस्तावाला कामगार संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. “कर्नाटक राज्य आयटी / आयटीइएस कर्मचारी संघटना” (KITU) या संघटनेने एक्सवर पोस्ट टाकून या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. संघटनेने सांगितले की, जर कामाचे तास कमी केले गेले नाहीत, तर मोठ्या संख्येने आयटी कर्मचारी या क्षेत्रातील नोकऱ्यांमधून बाहेर पडतील. “जर सध्या विचाराधीन असलेला प्रस्ताव मंजूर झाला तर सध्या कंपन्यांमध्ये लागू असलेली तीन शिफ्टची पद्धत बदलून दोन शिफ्टमध्ये काम सुरू होईल. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नाईलाजाने नोकरी गमवावी लागेल. यातून अनेकांचा रोजगार जाऊ शकतो”, अशी काळजी या संघटनेने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा >> नारायण मूर्ती स्वतः किती तास काम करायचे? ‘आठवड्याला ७० तास काम’ वादानंतर मूर्तींचा खुलासा

तसेच या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात, असाही प्रश्न संघटनांनी उपस्थित केला आहे. “एका अहवालानुसार आयटी सेक्टरमधील कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. तसेच ५५ टक्के कर्मचाऱ्यांना शारीरिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. जर कामाचे तास वाढविले, तर या समस्या आणखी उग्र होऊ शकतात”, अशीही भीती कामगार संघटनेने व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka it firms employees propose 14 hour workday workers union term move attempt to impose slavery kvg