देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच कर्नाटकमध्ये मात्र कथित सेक्स स्कँडल प्रकरण समोर आले आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर जनता दल सेक्युलरने (जेडीएस) प्रज्वल रेवण्णा यांचे पक्षातून निलंबन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मंगळवारी जेडीएसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सेक्स स्कँडल प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तो पर्यंत प्रज्वल रेवण्णा यांचे निलंबन कायम राहणार असल्याची माहिती कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी दिली आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांनी परदेशात पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. प्रज्वल रेवण्णा हे हसन मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटक पोलिसांनी सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी एसआयटीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष चौकशी पथकाकडून या संदर्भात दाखल तक्रारींची चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : ‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात सेक्स स्कँडलचे आरोप एका भाजपाच्या नेत्याने केले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. या प्रकरणातील सत्य एसआयटीच्या तपासामधून समोर येईल, दोषींना शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्यांनी दिली आहे.

कुमारस्वामी काय म्हणाले?

कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत प्रज्वल रेवण्णा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “एसआयटीचा तपास होईपर्यंत प्रज्वल रेवण्णा यांचे निलंबन कायम राहिल. आपण कधीही चूक करणाऱ्याचा बचाव करणार नाही आणि केलेला नाही. पण या वादात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नाव घेणे चुकीचे आहे”, असे मत कुमारस्वामी यांनी व्यक्त केले

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka jds mp prajwal revanna sex scandal case update suspension of mp prajwal revanna from jds party gkt
Show comments