कर्नाटकात भाजपाला सत्ता मिळवण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस-जेडीएस ही नवी आघाडी आकाराला आली असली तरी या आघाडीच्या भविष्याबाबत मात्र साशंकता आहे. कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले. मात्र त्याआधी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री जी.परमेश्वर यांनी कुमारस्वामींना झटका दिला.
कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाचा पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील का ? या प्रश्नावर त्यांनी आम्ही अद्याप यावर चर्चा केलेली नाही असे उत्तर दिले. आमचा अजून खातेवाटपाचाही निर्णय झालेला नाही. कोणते खाते आमच्याकडे येणार? कोणते त्यांना मिळणार? हे सुद्धा अजून ठरलेले नाही. त्यामुळे पाचवर्षाच्या कार्यकाळाबद्दल आताच सांगू शकत नाही असे परमेश्वर म्हणाले. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यासंदर्भात काँग्रेस आणि जेडीएसमध्ये काहीही ठरलेले नाही असे कुमारस्वामी यांनी सुद्धा आधीच स्पष्ट केले आहे.
दरम्यान कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. येडियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेस-जेडीएस आणि बसपाच्या एकूण ११७ आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. भाजपाचे सरकार अडीच दिवसात कोळसल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. बुधवारी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.