कर्नाटकमधील ४५ वर्षीय लिंगायत संताच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बसवलिंगा स्वामी यांना हनीट्रॅप करण्यात आलं होतं. तसंच त्यांना आक्षेपार्ह व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल केलं जात होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये असणारी दोन नावं मठाशी संबंधित नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
“एक अज्ञात महिला आणि बसवलिंगा स्वामी यांच्यातील खासगी क्षण एका महिलेने फोनमध्ये रेकॉर्ड केले होते,” अशी सूत्रांची माहिती आहे. एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘सुसाईट नोटमध्ये एका महिलेने माझ्यासोबत हे केलं आहे’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी बसवलिंगा स्वामी यांचा मठातील प्रार्थना खोलीत मृतदेह आढळला होता. त्यांनी खिडकीच्या ग्रीलच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी काही लोक आपल्याला या पदावरुन हटवण्याचा प्रयत्न असून, ते ब्लॅकमेल आणि छळ करत असल्याचा उल्लेख केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि इतर काहींनी बसवलिंगा स्वामी यांना व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती. हे लोक कोण आहेत याची माहिती आम्हाला मिळाली आहे.
“मठाच्या आत आणि बाहेर राजकारण असण्याची शक्यता आहे. काही संतांचे राजकारण्यांशी संबंध असून ते एकमेकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करु शकतात. पण सुसाईड नोटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांना एकूण चार व्हिडीओ मिळाले असून संबंधित महिलेचाही शोध घेतला जात आहे.