बंगळुरूमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामुळं बंगळुरू हादरलं होतं. आता पुन्हा एक धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. बंगळुरूच्या नगरभावी येथे एक इसमाने आपल्या पत्नीच्या घरासमोर स्वतःला जाळून घेतलं. पत्नी घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे पतीनं नाईलाजाने हे पाऊल उचलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पतीचे नाव मंजूनाथ (३९) असून तो कुनीगल शहरात राहणारा होता. तो कॅबचालक होता. मंजूनाथचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. त्यांना ९ वर्षांचा मुलगा आहे.
गेल्या काही वर्षांपासून मंजूनाथ आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून ते विभक्त झाले होते. तसेच पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यामुळे मंजूनाथने पत्नीच्या घरी जाऊन घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यासाठी तिची समजूत काढली. मात्र पत्नीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला.
पत्नीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास नकार दिल्यानंतर मंजूनाथने टोकाचे पाऊल उचलले. त्याने पेट्रोलचा कॅन आणत पत्नीच्या घरासमोरच स्वतःला जाळून घेतले. मंजूनाथचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी पत्नीला यासाठी जबाबदार ठरवले आहे. ज्ञानभारती पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अतुल सुभाष प्रकरण काय होते?
बंगळुरूमध्ये ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि२४ पानांची सुसाइड नोट लिहिली. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियावर अतुल सुभाष यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. अतुल यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी पत्नीने तीन कोटी आणि मुलाला भेटू देण्यासाठी तीस लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप अतुल सुभाष यांच्या भावाने केला होता.