Woman Alive After Husband Serves Murder Jail Time: ‘१०० गुन्हेगार सुटले तरी एका निष्पाप नागरिकाला नाहक शिक्षा होता कामा नये’, न्यायिक निवाडा करताना हे सूत्र पाळले जाते. मात्र पोलिसांनी जर तपासात कसूर केली असेल तर निष्पाप नागरिकालाही शिक्षा भोगावी लागते. कर्नाटकमध्ये असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली एका पतीला दीड वर्ष कारावास भोगावा लागला. अखेर पत्नीच न्यायालयात हजर झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांना १७ एप्रिलच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकरण काय आहे?
या प्रकरणातील पतीचे नाव सुरेश (वय ३८) आहे. तर पत्नीचे नाव मल्लिगे असे आहे. मल्लिगेच्या खुनाच्या आरोपानंतर सुरेश दीड वर्षांपासून कारावासात होता. डिसेंबर २०२० मध्ये सुरेशने पत्नी मल्लिगे कोडगू जिल्ह्यातील कुशलनगर येथून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर तपास करत असताना पोलिसांना बेट्टादरापुरा (पेरियापटना तालुका) येथे एका महिलेचा सांगाडा सापडला. हा सांगाडा मल्लिगेचा असून सुरेशनेच तिचा खून केला, असा आरोप पोलिसांनी केला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली.
१ एप्रिल रोजी सुरेशच्या एका मित्राला मल्लिगे मदिकेरी येथे दिसून आली. ती दुसऱ्या पुरुषाबरोबर राहत असल्याचे त्याला आढळले. त्यानंतर ही बाब अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली गेली. तसेच मल्लिगेलाही न्यायालयात सादर केले.
पोलीस तपासात अक्षम्य निष्काळजीपणा दाखवून सुरेशला दीड वर्ष तुरुंगात घालवावा लागल्यामुळे न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले. तसेच १७ एप्रिलपर्यंत या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितले.
सुरेशचे वकील पांडू पुजारी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सुरेश हा कुशलनगर गावचा रहिवासी आहे. त्याने २०२० साली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याचवेळेस बेट्टादरापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मृत महिलेचा सापळा आढळून आला. त्यानंतर एका वर्षाने बेट्टादरापुरा पोलिसांनी सुरेशला अटक केली. सदर सापळा मल्लिगेचा असून सुरेशनेच तिचा खून केला असावा, असा आरोप त्याच्यावर ठेवला. पोलिसांनी मल्लिगेच्या आईचे रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी घेतले.
डीएनए चाचणीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांनी अंतिम आरोपपत्र दाखल केले. सुरेशला न्यायालयाने तत्पूर्वी जामीन दिला. त्यानंतर डीएनए चाचणीचा अहवाल आला मात्र तो आईच्या नमुन्यांशी जुळला नाही. ही बाब आम्ही न्यायालयात मांडल्यानंतर न्यायालयाने आमचा मुद्दा फेटाळून लावला आणि मल्लिगेची आई व इतर ग्रामस्थांची साक्ष ग्राह्य धरली, असे वकिलांनी सांगितले.
अखेर १ एप्रिल रोजी मडीकेरी येथे मल्लिगे आढळून आली. त्यानंतर तिला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जाब विचारल्यानंतर मल्लिगेने दुसऱ्या पुरूषाबरोबर पळून जाऊन लग्न केल्याचे मान्य केले. तसेच आपण पळू गेल्यानंतर सुरेशचे काय झाले? याची आपणाला कल्पना नव्हती, असेही सांगितले. मडिकेरी पासून केवळ २५ ते ३० किमी अंतरावरील एका गावात मल्लिगे राहत होती, पण पोलिसांनी तिला शोधण्याचा जराही प्रयत्न केला नाही, असा आरोप सुरेशच्या वकिलाने केला आहे.
वकील पांडू पुजारी पुढे म्हणाले की, आता हे प्रकरण दुर्मिळ आणि गंभीर बनले आहे. पोलिसांना सापडलेला सापळा नेमका कुणाचा होता? पोलिसांनी खोटे आरोपपत्र का सादर केले? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत. आम्ही आता न्यायालयाच्या अंतिम निकालाची वाट पाहत आहोत. तसेच सुरेशला मागच्या दीड वर्षात ज्या मनस्तापाला सामोरे जावे लागले, त्याची भरपाई मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.