कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या २३ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या झाल्याने सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. रविवारी रात्री शिवमोग्गा जिल्ह्यात हर्षाची हत्या करण्यात आल्याने काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. हत्येनंतर परिसरात तणाव असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहे. चार ते पाच जणांनी मिळून हर्षाची हत्या केली. रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर हर्षाचा मृतदेह घरापर्यंत रॅली काढत नेण्यात आला. यावेळी काही ठिकाणी दगडफेक झाल्याचे प्रकारही घडले.
काँग्रेसने याप्रकरणी गृहमंत्री आणि मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी सरकारने मारेकऱ्यांचा शोध घेत त्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. आपल्याच जिल्ह्यात हत्या झाल्यामुळे गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान के एस ईश्वरप्पा यांनी काँग्रेस पक्षाने उकसवल्यामुळे हत्या झाल्याचा आरोप केला आहे. “आमच्या पक्षातील एका चांगल्या कार्यकर्त्याची शिवमोग्मामध्ये हत्या झाली आहे. मुस्लीम गुडांनी हे केलं आहे. याआधी मुस्लिम गुंडांमध्ये इतकी हिंमत नव्हती. अशा लोकांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत.
काँग्रेसचे प्रमुख शिवकुमार यांनी केलेल्या भडकाऊ वक्तव्यांमुळेच ही हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. शिवकुमार यांनी ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांना मारेकऱ्यांना शोध दे आणि जर माझा सहभाग आढळला तर त्यात माझंही नाव टाका असं सांगितलं आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावेळी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तपास सुरु असून आरोपींनी लवकरच अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यावर बोलण्याचं टाळत तपासातून काय समोर येतं ते पाहिल्यानंतरच भाष्य करु असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर हिजाबसंबंधी पोस्ट टाकल्यामुळे ही हत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या हिजाब वादाशी याचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्हाला पुढील तपासाची प्रतीक्षा करावी लागेल”. टेलर असणाऱ्या या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची गृहमंत्र्यांनी भेटही घेतली आहे.
“रविवारी रात्री ९.३० वाजता हत्या झाली. पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत. आम्ही लवकरच आरोपींना अटक करु,” असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी लोकांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. “या हत्येचं नेमकं कारण काय याची माहिती अद्याप मिळालेली नाही. शिवमोग्गा राखीव पोलिसांना पाठवलं जात आहे,” असं त्यांनी सांगितलं.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. तर रॅपिड अॅक्शन फोर्सलाही तैनात केलं जात आहे. गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शिवमोग्गामधील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. पूर्वकाळजी म्हणून परिसरातील शाळा आणि कॉलेज दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत”.