Arun Yogiraj : कर्नाटकचे मूर्तीकार अरुण योगीराज यांची सध्या चर्चा आहे कारण त्यांनी कृष्ण शिळेत साकारलेली रामलल्लाची मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाली आहे. २२ तारखेला गाभाऱ्यात या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. अरुण योगीराज यांनी ही मूर्ती कशी घडली त्याबाबत सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले अरुण योगीराज?

सात महिन्यांपासून मी ही मूर्ती कृष्ण शिळेत कोरत होतो. दिवसरात्र मनात हाच विचार येत होता की संपूर्ण देशाला प्रभू रामाचं दर्शन मी घडवलेल्या मूर्तीत कसं घडेल. आम्ही सर्वात आधी पाच वर्षांच्या मुलांची माहिती मिळवली. पाच वर्षांच्या रामाची मूर्ती साकारणं हे खरोखरच आव्हानात्मक होतं. आज सगळ्यांनाच ती मूर्ती आवडली आहे त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे असं अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अरुण योगीराज पुढे म्हणाले, “आमचं घराणं शिल्पकारांचंच आहे. माझ्या घरात ३०० वर्षांपासून मूर्ती दगडात कोरल्या जातात. मूर्तीकार म्हणून माझी ही पाचवी पिढी आहे. रामाच्या कृपेनच मला हे काम मिळालं. माझे वडील हेच माझे गुरु आहेत. माझ्या घरातल्या पिढ्या ३०० वर्षांपासून मूर्ती घडवत आहेत. आता देवानेच सांगितलं या आणि माझी मूर्ती घडवा. हा अनुभव खूपच सुंदर आणि मन प्रसन्न करणारा होता.”

हे पण वाचा- Arun Yogiraj: दगडाला देवपण देणारे हात! अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्ती पाहून तुम्हीही हेच म्हणाल

रामलल्लाचं मधुर हसू कसं आलं?

रामलल्लाच्या चेहऱ्यावर जे मधुर हसू आहे त्याबाबत अरुण योगीराज म्हणाले जेव्हा मूर्तीच्या चेहऱ्यावर काम करायचं असतं त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर भाव आणायचे असतात तेव्हा सुधारणा करण्याची संधी कमी असते. त्यासाठी ज्या शिळेत मूर्ती घडवत आहोत त्या शिळेबरोबर जास्त काळ राहणं गरजेचं असतं. लहान मुलांचे फोटो मी मोठ्या प्रमाणावर पाहिले होते. एक हजार फोटो मी सेव्ह करुन ठेवले होते. तसंच मी माझ्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करुन होतो. पुढच्या दिवशी काय करायचं आहे याचा अभ्यास आदल्या दिवशीच करायचो. पाच वर्षांच्या मुलांचे चेहरे मनात आणि डोक्यात आणून मूर्ती घडवत गेलो. त्यातूनच रामाच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू निर्माण झालं असंही अरुण योगीराज सांगतात.

सर्वात जास्त चिंता कसली वाटली?

रामाची मूर्ती घडवताना मी काम करत होतो हे मान्य पण मला पूर्ण कल्पना आहे की प्रभू रामानेच माझ्याकडून तशी मूर्ती घडवून घेतली. सात महिने मी काम करत होतो, देवाचा आशीर्वाद होता म्हणूनच मी मूर्ती घडवू शकलो. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. माझी मुलगी सात वर्षांची आहे. तिला मी विचारायचो की बेटा ही मूर्ती कशी दिसते? तर ती म्हणायची लहान मुलासारखीच दिसते आहे. मला मूर्तीचं काम करताना फक्त इतकंच वाटायचं की ही मूर्ती लोकांना आवडेल की नाही? मात्र लोकांना, सगळ्या भारत देशातल्या जनतेला ही मूर्ती आवडली त्यांनी मनोभावे या मूर्तीला नमस्कार केला ही माझ्यासाठी प्रचंड समाधान देणारी बाब आहे असं अरुण योगीराज म्हणाले.

अरुण योगीराज यांनी सांगितलं की मला दगडातून मूर्ती साकारायाची आहे आणि ती रामलल्लाची मूर्ती आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मी त्यावर विचार केला. खरंतर दगडात एखादा चेहरा कोरायचा असेल तर मी दोन तीन तासात तो कोरु शकतो. मात्र रामलल्लाच्या मूर्तीचं घडवणं वेगळं होतं. माझ्याकडे खूप सारखे फोटो आणि माहिती होती. त्यानुसार मी ही मूर्ती साकारली आहे.

रोज येणारं माकड

अरुण योगीराज यांनी सांगितलं की जेव्हा मी ही मूर्ती तयार करत होतो तेव्हा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक माकड येऊन बसायचं. काही दिवस थंडीचे होते म्हणून आम्ही कार्यशाळेचं दार लावून घेतलं. तर बाहेर आलेल्या माकडाने दार वाजवलं होतं. हे माकड रोज संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास यायचं. मी जेव्हा चंपत राय यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले की हनुमानजींनाच प्रत्यक्ष बघायचं असेल की रामलल्लाची मूर्ती कशी तयार होते आहे. मी जेव्हा झोपण्यासाठी डोळे बंद करायचो तेव्हाही मला मूर्तीच समोर दिसत होती असंही अरुण योगीराज यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka mysore sculptor arun yogiraj interview ayodhya ram lalla ram mandir scj