बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनला आजपासून ( १९ डिसेंबर ) सुरुवात होणार आहे. त्याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीककरण समितीचा मेळावा आयोजित केला होता. मात्र, या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच, मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठही पोलिसांनी हटवलं आहे.
त्यातच आता बेळगावातून मोठी घडामोड समोर येत आहे. बेळगाव एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. बेळगावच्या माजी महापौर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मेळाव्याला परवानगी देखील नाकारली आहे. यामुळे एक संतापाची लाट कर्नाटक सरकारविरोधी उमटली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याबाबत बोलताना म्हणाले, “बेळगावात कर्नाटकाचे सरकार अधिवेशन घेत तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अधिकारी आणि पदाधिकार मिळून प्रतिकात्मक आंदोलन करतात. त्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलून त्या कार्यकर्त्यांना सोडण्यात यावं,” अशी विनंती करतो, असं रोहित पवार यांनी म्हटलं.