Karnataka : कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एका भाड्याच्या घरात ५०० रुपयांच्या मोठ्या प्रमाणात संशयास्पद नोटा आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे उत्तर कन्नड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दांडेलीच्या गांधीनगर भागात ही घटना घडली आहे. तसेच या नोटांवर फक्त चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी असं लिहिलेलं होतं. मात्र, बनावट नोटा आणि त्या देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

नेमकं काय घडलं?

कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील एका भाड्याच्या घरात ५०० रुपयांच्या मोठ्या प्रमाणात नोटा असल्याची टीप पोलिसांना खबऱ्यामार्फत समजली. यानंतर पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला आणि धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी त्या घरात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा आढळून आला. तसेचया नोटांवर फक्त चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी असं लिहिलेलं होतं. तसेच यावेळी संपूर्ण घराची झडती देखील घेण्यात आली. तेव्हा या नोटांबरोबर तेथे पैसे मोजण्याचे मशीन देखील आढळून आलं.

आता बनावट नोटांचा साठा आणि तेथे पैसे मोजण्याचे मशीन आढळून आल्यामुळे पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. आता या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे ही शोध मोहीम राबवण्यात आली. ज्या घरात कारवाई करण्यात आली, त्या घरी भाडेकरू अर्शद खान नामक व्यक्ती राहत होता. तो मूळचा गोव्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच या संपूर्ण नोटा जप्त करण्यात आल्या असून या नोटांवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ऐवजी ‘रिव्हर्स बँक ऑफ इंडिया’ असं लिहिलेलं होतं. तसेच या नोटांवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी नव्हती. तसेच या संपूर्ण नोटांवर क्रमांकांऐवजी फक्त शून्य लिहिलेले होते. तसेच चित्रपट निर्मितीसाठी स्पष्टपणे चिन्हांकित केलेलं होतं, अशी माहिती पोलिसांनी सांगितली.

दरम्यान, आता त्या घरात राहणाऱ्या अर्शद खानचा पोलीस शोध घेत असून तो गेल्या एक महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती सांगितली जाते. तसेच या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा कुठून आल्या? तेथे पैसे मोजण्याचे मशीन कसे? तसेच जर या नोटा चित्रपटाच्या शुटींगसाठी असतील तर तेथे राहणारा भाडेकरू एका महिन्यापासून बेपत्ता कसा? अशा वेगवेगळ्या बाजूंनी पोलिसांनी तपास सुरु केला असल्याची माहिती सांगितली जात आहे.