कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) यांच्यात लढत होणार आहे. १० मे रोजी मतदान होणार आहेत. तर, १३ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. अशातच बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे पोलिसांनी मोठी रक्कम हस्तगत केली आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यातच बेळगावातील रामदुर्ग येथे बुधवारी रात्री गाड्यांची तपासणी करत असताना १.५४ रुपयांची रक्कम पोलिसांनी पकडली आहे. पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला माहिती दिली आहे. मात्र, ही रक्कम कोणत्या पक्षाशी संबंधित असल्याचं अद्याप समोर आलं नाही.
एका पोलीस अधिकाऱ्याने ‘एएनआय’ला सांगितलं की, “एका कारमध्ये पैसे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कार थांबवून चौकशी केली असता, त्यातून १.५४ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. तसेच, आयकर विभागाला याबद्दल माहिती देण्यात आली आहे.”
हेही वाचा : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा उमेदवारी अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शन, समर्थकांचा जल्लोष
दरम्यान, २९ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ७६.७० कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर, ४२,८२ कोटी रुपयांची दारू आणि सोन्यासह २०४ कोटी रुपयांच्या धातूचे साहित्य जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.