रेल्वे मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त केलेले पश्चिम रेल्वेचे महासंचालक महेशकुमार यांच्याकडून ९० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यांचे मंत्रीपद राहणार की जाणार या मुद्दय़ावर काँग्रेसच्या कोअर ग्रुपची रविवारी सलग दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
बन्सल तसेच कायदा व न्याय मंत्री अश्विनीकुमार यांना हटविले नाही तर भाजपसह अनेक विरोधी पक्ष उद्या संसदेचे कामकाज चालू देणार नाहीत, हे उघड आहे. सोमवारी अश्विनीकुमार यांच्या प्रकरणात सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयात नवे प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असून त्यानंतर सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. अश्विनीकुमार आणि बन्सल यांना मंत्रिमंडळातून हटविल्यास कायदा व न्याय खाते दळणवळणमंत्री कपिल सिब्बल यांना तर रेल्वेमंत्रीपद अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रविवारी बन्सल यांच्या निवासस्थानापुढे भाजप आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. बन्सल यांचे पुत्र आणि पुतण्याचे त्यांचा भाचा विजय सिंगला यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. बन्सल यांच्या निवासस्थानाचा पत्ताच त्यांच्या पुतण्याचा पत्ता असल्याचे सांगून संपूर्ण बन्सल कुटुंब रेल्वे लाचकांडात सहभागी असल्याचा त्यांनी आरोप केला. विरोधी पक्षांना राजीनामा मागण्याचा रोग लागला असल्याच्या काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसला देश लुटण्याचा रोग लागला आहे, असा टोला भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी लगावला.
या प्रकरणी आतापर्यंत विजय सिंगला, महेशकुमार, मध्यस्थ संदीप गोयल, समीर संधीर, मंजुनाथ, राहुल यादव यांच्यासह आठ जणांना अटक झाली असून अजय गर्ग आणि सुनील डागा यांची सीबीआयकडून चौकशी सुरू होती. चौकशीनंतर त्यांनाही अटक करण्याचे संकेत देण्यात आले.
महेशकुमार यांना रेल्वे मंडळाच्या सदस्यपदावरून निलंबित करण्यात आले आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात मंत्री असलेले बन्सल यांची आजवर भ्रष्ट मंत्री अशी कधीही प्रतिमा नव्हती. पण त्यांच्यावर अचानक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बन्सल यांची आतापर्यंत  काँग्रेसकडून जनार्दन द्विवेदी, दिग्विजय सिंह तसेच जदयुचे अध्यक्ष शरद यादव आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी पाठराखण केली आहे.
इमानदार व्यक्ती!
माजी रेल्वेमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही बन्सल यांची पाठराखण केली आहे. बन्सल एक इमानदार व्यक्ती आहेत. त्यांच्या पुतण्याने त्यांच्या नावाचा व पदाचा गैरवापर केला असावा. नातेवाईक बऱ्याचदा मंत्र्याच्या नावाचा गैरवापर करतात, असेही लालूप्रसाद यादव यांनी पत्रकारांना सांगितले.

हिशेब चुकता केला?
महेशकुमार आणि विजय सिंगला यांच्यात झालेल्या सहा दूरध्वनी संभाषणांचे टॅपिंग करून सीबीआयने त्यांना लाचखोरीच्या जाळ्यात अडकविले. पण सीबीआयला सिंगला आणि महेश कुमार यांचे फोन टॅप करण्याची परवानगी कशी मिळाली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा ममता बनर्जी यांच्या काळात रेल्वे सुरक्षा दलाचे प्रमुख होते. पण त्यांना रेल्वेतून हुसकावून लावण्यात महेशकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे म्हटले जाते. सिन्हा कालांतराने सीबीआयचे प्रमुख झाले आणि त्यांनी महेशकुमार यांना या प्रकरणात अडकवून हिशेब चुकता केल्याचीही चर्चा आहे. विजय सिंगला उद्योजक असल्याने ते कुणाशीही पैशाचे व्यवहार करू शकतात. अशा स्थितीत सिंगला यांना महेशकुमार यांनीच पैसे दिले कशावरून, असाही प्रश्न विचारला जात आहे.

Story img Loader