बंगळूरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ७२ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या २२४ जागांसाठी पार पडलेल्या मतदानात रामनगर येथे सर्वाधिक ७८.२२ टक्के मतदान झाले होते. बंगळूरु शहरमध्ये ४८.६३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात एकूण ७२.३६ टक्के मतदान झाले होते.
या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलात तिरंगी लढत झाली. निवडणुकीसाठी पाच कोटी ३१ लाख मतदारहोते. दोन हजार ६१५ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी दि.१३ मे रोजी होणार आहे.
सीमाभागात चुरस
कोल्हापूर : सीमाभागात मतदानात उत्साह दिसून आला. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली तरीही काही केंद्रांमध्ये रांगा लागलेल्या होत्या. बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात सरासरी ७३ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढली असल्याने एकीकरण समितीच्या ५ उमेदवारांच्या निकालाकडे लक्ष वेधले आहे.